राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार, आज राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू झाली. पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सुमारे 6.3 लाख नोंदणीकृत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण 6,70% सदस्य आणि 264 अध्यक्षांचे भवितव्य ठरेल. नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 416 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली. नगराध्यक्ष व सदस्य पदांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होईल. नगराध्यक्षपदासाठी तब्बल 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी अडीच हजार शासकीय कर्मचारी सेवेत आहेत.
संवेदनशील बूथवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात आहे. भगूर, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, येवला, पिंपळगाव, ओझर, इगतपुरी येथे महायुती आमने–सामने मतदान पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद. आज छत्रपती संभाजीनगरमधील 6 नगरपरिषदेसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झालीये. आज सिल्लोड, पैठण, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली.
प्रामुख्याने सिल्लोड नगरपरिषद अब्दुल सत्तार यांच्यासाठी तर पैठण नगरपरिषद खासदार संदिपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्यासाठी आणि वैजापूर नगरपरिषद शिंदे शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे, पिंपळनेर नगरपरिषद तसेच शिंदखेडा नगरपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झालीये. नगरअध्यक्षपदाच्या 3 जागांसाठी दहा उमेदवार रिंगणात आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. अहिल्यानगर जिल्ह्यात 12 पैकी आठ नगरपरिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार तर जिल्ह्यातील चार ठिकाणी नगरपरिषदेला स्थगिती देण्यात आली. बदलापूर नगरपरिषदेच्या 43 जागांसाठी मतदानाला सुरूवात. 6 जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये लढत आहे.
सकाळीपासून बदलापूरमधील गांधी चौक परिसरातील मराठी शाळेत मतदारांच्या लांबच लांब रांगा. बदलापूरमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असून यावेळी भाजप आणि शिवसेनेची लढत असल्याने बदलापूर नगर परिषदेवर नेमका कोणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सटाणा नगरपरिषद निवडणुकांचा मतदान प्रकियेला सुरूवात. 22 जागांसाठी 74 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
भाजपकडून योगिता मोरे, शिवसेना शिंदे गटाकडून हर्षदा पाटील भाजपमधून वेगळा गट तयार होऊन उमेदवारी करणारे रूपाली कोठावदे यांच्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये आज आठ नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आठ नगराध्यक्ष आणि 183 सदस्याचे भवितव्य आज मत पेटीमध्ये बंद होणार आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिकेच्या 93 प्रभागासाठी 287 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
धाराशिव आणि उमरगा येथील प्रत्येकी तीन जागेवर मतदान प्रक्रियेला स्थगिती असून 20 डिसेंबर रोजी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात दोन लाख 43 हजार मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील भूम, परंडा कळंब, धाराशिव, तुळजापूर नळदुर्ग, मुरूम आणि उमरगा या आठ नगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी आमदार तानाजी सावंत, आमदार राणा जगजीत सिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री बसवराज पाटील या महत्त्वाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


