इचलकरंजीतील मलाबादे चौकात उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे आगमन आज कबनुर येथे मोठ्या उत्साहात झाले. पुतळा येताच परिसरात शंखनाद, मंत्रोच्चार आणि जयघोष दुमदुमला. मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळ्याची विधीवत पूजा करून प्रथमदर्शन सोहळा पार पडला.
क्रेनच्या सहाय्याने पुतळ्यावरील वस्त्र काढताच उपस्थित नागरिकांनी घोषणा परिसर दणाणून टाकला. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने मलाबादे चौकात उभारण्यात येणारा हा 11 फूट उंच आणि सुमारे 1500 किलो वजनाचा ब्राँझचा तेजस्वी पुतळा मोरेवाडी, कोल्हापूर येथील मूर्तिकारांनी साकारला आहे. त्याच्या आगमनानिमित्त कबनुरमध्येच प्रथम पूजा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, सरपंच सुलोचना कट्टी, शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र माने, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाजन, संजय तेलनाडे, साद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुतळा प्रथमदर्शनानंतर विद्युत रोषणाईने सजलेल्या सवाद्य मिरवणुकीचा भव्य प्रारंभ झाला. कबनुर ते इचलकरंजी मार्गावर दुतर्फा आकर्षक रांगोळ्या, स्क्रिनवरील
धर्मवीर संभाजी महाराजांवरील माहितीपट, ठिकठिकाणी होत असलेली पुष्पवृष्टी आणि आतषबाजीने वातावरण अधिकच उत्साहवर्धक झाले. पुतळा शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहचेपर्यंत नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या या भव्य मिरवणुकीतून संभाजी महाराजांच्या इतिहासातील पराक्रमाची उजळणी झाली असून, पुतळा प्रतिष्ठापनेसाठी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.



