कॉन्स्टेबलच्या नवीन भरतीची प्रतिक्षा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 25 हजारांहून अधिक पदांसाठी GD कॉन्स्टेबलसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे.
SSC GD कॉन्स्टेबल भरती 2025 चं नोटफिकेशन प्रसिद्ध झालं आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या ssc.gov.in या अधिकृत वेबसाइट वर अर्ज करू शकतात.
SSC GD पदांसाठी असलेली ही भरती BSF, CISF, CRPF, SSB इत्यादी दलांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. 25,487 पदांपैकी, CISF मध्ये सर्वाधिक जागा रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता
1 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यापूर्वी मान्यताप्राप्त मंडळातून किमान 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या GD भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या तारखेपर्यंत पात्रता निकष पूर्ण न करणारे उमेदवार भरतीसाठी पात्र राहणार नाहीत. याशिवाय, जर तुमच्याकडे NCC (एनसीसी) प्रमाणपत्र असेल, तर तुम्ही फॉर्म भरताना ते सादर करू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या परीक्षेतील गुणांवर बोनस गुण मिळतील.
वयोमर्यादा: 18 ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. 1 जानेवारी 2026 तारीख लक्षात घेऊन वयाची गणना केली जाईल. म्हणून, अर्जदारांची जन्मतारीख 2 जानेवारी 2003 पूर्वीची आणि 1 जानेवारी 2008 नंतरची नसावी. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
उंची: या भरतीमध्ये पात्र ठरण्यासाठी पुरुषांची उंची 170 सेमी आणि महिलांची 157 सेमी असावी. पुरुष उमेदवारांची छाती 80 सेमी आणि अतिरिक्त 5 सेमी फुगवून असायला हवी.
धावणे (शारीरिक क्षमता चाचणी): पुरुष उमेदवारांना 5 किमी अंतर 24 मिनिटांत धावून पूर्ण करावं लागेल, तसेच महिलांना 1.6 किमी अंतर 8 मिनिटांत पूर्ण करणं आवश्यक आहे.
पगार: पे लेव्हल-3 नुसार, दरमहा 21,700-69,100 रुपये पगार मिळेल.
निवड प्रक्रिया: या भरतीसाठी लेखी परीक्षा, डॉक्यमेंट व्हेरिफिकेशन, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी अशी निवड प्रक्रिया असेल.
अर्ज शुल्क: उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. महिला/ एससी/ एसटी/ ईएसएम श्रेणीतील अर्जदारांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.



