Saturday, December 13, 2025
Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्याचाच खून करण्याचा प्रयत्न

विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्याचाच खून करण्याचा प्रयत्न

वर्गकप्तान असलेल्या १३ वर्षीय विद्यार्थ्याला त्याच वर्गातील विद्यार्थ्यांनी लाथाबुक्क्यांनी तसेच गळ्यावर, पोटावर आणि डोक्यावर मारुन, गळा आवळून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला.

 

ही धक्कादायक घटना लाखनीजवळील केसलवाडा येथील स्व. निर्धनराव पाटील वाघाये सैनिकी विद्यालयाच्या वसतीगृहात मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

 

याप्रकरणी लाखनी पोलिस ठाण्यात चार विधीसंघर्ष बालकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी याच वसतीगृहाच्या इमारतीवरुन पडून एका आदिवासी बालकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. जय खोमदेव हलमारे (१३) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. जय हा वर्गाचा कॅप्टन आहे. यातील चारही विधीसंघर्ष बालक हे १३ वर्षांचे असून गोंदिया, लाखांदूर, केसलवाडा, मदनापूर ता. कुही या गावातील आहेत.

 

हे विद्यार्थी वर्गात नेहमी नियम तोडत असल्याने जय त्यांना ताकीद देत होता. त्याचा राग मनात धरुन ९ ऑक्टोबर २०२५च्या मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास वसतीगृहात चारही विद्यार्थ्यांनी जयला लाथाबुक्क्यांनी तसेच डिव्हायडरने गळ्यावर, पोटावर, कमरेला, डोक्यावर मारले. लाकडी दांड्याने डोक्यावर मारुन आणि दुपट्टयाने गळा आवळला. हातानेही गळा दाबून त्याचा खून करण्याच्या उद्देशाने मारहाण केली.

 

वैद्यकीय अहवालात जयच्या शरीरावर, गळ्यावर अनेक दुखापती, व्रण, रक्तस्त्राव असल्याचे नमूद आहे. याप्रकरणी वैद्यकीय अहवाल आणि बाल कल्याण समितीच्या पत्रावरुन लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू साळवे करीत आहेत.

 

दोन महिन्यानंतर गुन्हा नोंद

९ ऑक्टोबर रोजी ही धक्कादायक घटना घडल्यानंतरही लाखनी पोलिसांकडून याप्रकरणी कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. काही सामाजिक संघटनांकडून याची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. सुमारे दोन महिन्यानंतर अखेरीस याप्रकरणी पोलिस कारवाई करण्यात आली. मागीलवर्षी याच शाळेतील वसतीगृहाच्या इमारतीवरुन पडून एका आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्याची चौकशीही थंड बस्त्यात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -