Friday, December 12, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीतील युवकाचा अपहरण करून निर्घृण खून

इचलकरंजीतील युवकाचा अपहरण करून निर्घृण खून

दुचाकी दुरुस्तीच्या बहाण्याने सुहास सतीश थोरात (19, रा. भोने माळ, इचलकरंजी) या युवकाचे अपहरण करून कागल तालुक्यातील अर्जुनी येथील देवचंद कॉलेजच्या पिछाडीस त्याचा खून केला व मृतदेह तिथेच ओढ्यात टाकल्याचे शनिवारी उघडकीस आले.

 

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच संशयित ओंकार अमर शिंदे (25), ओंकार रमेश कुंभार (21, दोघे रा. लिगाडे मळा, इचलकरंजी) व एक अल्पवयीन मुलगा अशा तिघांना ताब्यात घेतले.

 

पूर्वी झालेल्या वादातून त्यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले. अटक केलेल्या दोघांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अल्पवयीन मुलास बालसुधारगृहात पाठविण्यात आले, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड व निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली. सुहास थोरात हा इलेक्ट्रिक वाहने विक्रीच्या दुकानात कामास होता. तिथूनच शुक्रवारी दुपारच्या सुमारास तिघांनी सुहासला दुचाकीची दुरुस्ती करायची असल्याचे सांगत घेऊन गेले. रात्री उशिरापर्यंत सुहास घरी न परतल्याने नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पूर्वी झालेल्या वादाच्या अनुषंगाने आपल्या मुलाच्या जीवास धोका असल्याने वडील सतीश थोरात यांनी शिवाजीनगर पोलिसात अपहरणाची तक्रार दिली होती.

 

त्या अनुषंगाने पोलिसांनी शोध मोहीम राबवत इचलकरंजी व चंदूर परिसरात कुंभार व शिंदेसह एक अल्पवयीनाला ताब्यात घेतले. चौकशीत खुनाचा प्रकार उघडकीस आला. सुहास थोरात याला संशयितांनी कागल तालुक्यातील देवचंद महाविद्यालयाच्या पिछाडीस नेऊन तिथे कोयतासारख्या धारदार शस्त्राने डोक्यात, हातावर, तोंडावर वार केले. सात ते आठपेक्षा अधिक घाव वर्मी बसल्याने सुहासचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह त्यांनी महाविद्यालयाच्या मागे असलेल्या ओढ्यात टाकल्याचे सांगितले. दरम्यान, मुरगूड पोलिसांना ओढ्यात अनोळखी मृतदेह निदर्शनास आल्याचे समजल्यानंतर सुहासची ओळख पटली. मुरगूड इथेच शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सुहास याचे वडील सतीश बळीराम थोरात (50) यांनी फिर्याद दिली आहे.

 

हल्लेखोर शाळकरी मुलगा

 

अल्पवयीन संशयित व सुहास हे दोघे मित्र होते. वर्षभरापूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. संशयित ओंकार शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. एकाच मोपेडवरून ते चौघेजण गेल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन संशयित हा शाळकरी मुलगा असून तो दहावीत शिकत आहे. संशयितांच्या चेहर्‍यावर पश्चात्तापाचा कोणताही लवलेश दिसून येत नव्हता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -