कोल्हापुरात यंदा थंडीच्या हंगामातील नीचांकी किमान तापमानाची नोंद शुक्रवारी (दि. 12) झाली. तापमान 13.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने कोल्हापूर गारठले आहे. सायंकाळनंतर हवेत गारवा निर्माण होत असून, रात्री व पहाटे हुडहुडी भरविणार्या थंडीची अनुभूती कोल्हापूरकरांना येत आहे.
12 वर्षांनंतर प्रथमच डिसेंबर महिन्यात पारा 13.5 अंशांपर्यंत खाली घसरला. पुढील आठवड्यातदेखील थंडीची हुडहुडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोल्हापूरचा पारा गेल्या चार दिवसांपासून 14 अंशांच्या घरात आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून कडाक्याची थंडी कोल्हापूरकरांना सहन करावी लागत आहे. शुक्रवारी दैनंदिन सरासरी किमान तापमानात 2.5 अंशांची घसरण होऊन पारा 13 अंशांपर्यंत घसरला, यामुळे रात्री व पहाटे थंडीची तीव्रता कमालीची वाढली होती. रात्री व पहाटे हवेत गारठा इतका वाढला होता की, स्वेटर, जॅकेट, कानटोपी, मफलर घातल्याशिवाय बाहेर पडणे अवघड झाले होते. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. थंडीत ऊब मिळावी यासाठी शहरात गल्लोगल्ली शेकोट्या पेटताना दिसत आहेत. स्वेटर, कानटोपी, जॅकेटस्, हातमोजे, मफलर खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शुक्रवारी कमाल तापमान 28.9 अंशांवर स्थिरावले होते.
अनुभूती 12 अंशांची
वार्यांचा वेग आणि हवेतला कोरडेपणा, यामुळे प्रत्यक्ष किमान तापमान 13.5 अंशांवर असले, तरी 12 अंशांपर्यंत तापमान खाली उतरल्याची अनुभूती येत आहे. रात्री बोचर्या वार्यांची तीव्रता वाढणे, जमिनीचे तापमान झपाट्याने घटणे आणि हवेत आर्द्रतेचे प्रमाण कमी होणे, या कारणांमुळे शरीराला प्रत्यक्ष तापमानापेक्षा एक अंश कमी थंडी जाणवत आहे.
12 वर्षांनंतर डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच तापमान 13 अंशांपर्यंत घसरले
डिसेंबर महिन्यात कोल्हापुरात 12 वर्षांनंतर प्रथमच तापमान 13 अंशांपर्यंत घसरले आहे. 2013 मध्ये 11 डिसेंबर रोजी 13.5 अंशांची नोंद झाल्यानंतर यंदा पुन्हा एवढी घसरण दिसली असून, दरवर्षी डिसेंबरमधील किमान तापमान साधारणतः 14 ते 16 अंशांदरम्यान राहते. मात्र, यंदा विकिरणीय थंडी, स्वच्छ आकाश आणि कोरड्या हवेमुळे तापमानात अचानक घट झाली आहे. या अपवादात्मक घसरणीमुळे कोल्हापूरच्या हिवाळ्यात एक दशकानंतर पुन्हा कडाक्याचा गारठा जाणवला आहे.





