Thursday, December 18, 2025
Homeराजकीय घडामोडीमाणिकराव कोकाटेंचं क्रीडा खातं काढून घेतलं, आता 'हा' नेता राज्याचा नवा क्रीडामंत्री

माणिकराव कोकाटेंचं क्रीडा खातं काढून घेतलं, आता ‘हा’ नेता राज्याचा नवा क्रीडामंत्री

अजित पवारांचे नेते माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. सदनिका प्रकरणात कोकाटेंविरोधात अटक वाँरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

 

तसंच कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची आमदारकी देखील रद्द होऊ शकते. कोकाटेंनी थेट हायकोर्टात जामिनासाठी धाव घेतली. मात्र, हायकोर्टानं या प्रकरणावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला असून शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे, त्यामुळे कोकाटेंना कधीही अटक होऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या शिफारशीनुसार राज्यपालांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडे असणारी खाती काढून घेतली आहेत.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहून माणिकराव कोकाटेंकडे असणारी काढून घेण्याची शिफारस केली होती. राज्यापालांनी ही शिफारस मान्य केल्याने आता कोकाटेंकडे कोणतंही खातं नसून, बिनखात्याचे मंत्री झाले आहेत.

 

 

कोण होणार नवे क्रीडामंत्री

 

“माननीय देवेंद्र फडणवीसजी, मला तुम्ही 17 डिसेंबर 2025 रोजी लिहिलेलं पत्र प्राप्त झालं आहे ज्यामध्ये तुम्ही माणिकराव कोकाटे यांच्याकडे असणारं क्रीडा आणि तरुण कल्याण, अल्पसंख्यांक विकास खातं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवली जावी. मी या मागणीला मान्यता देत आहे,” असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. म्हणजेच अजित पवार आता राज्याचे नवे क्रीडामंत्री होणार आहेत.

 

माणिकराव कोकाटेंना अटक कशासाठी होणार?

 

माणिकराव कोकाटे हे सदनिका वाटपातील गैरव्यवहार अडचणीत सापडले आहेत. 1995 सालच्या शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 20 फेब्रुवारी 2025 रोजी प्रथम वर्ग न्यायालयाने हीच शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे मंत्री कोकाटे यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे.

 

माणिकराव कोकाटे यांनी अटक टाळण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली. मात्र हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्काळ सुनावणीस नकार दिला.

 

रुग्णालयात दाखल

 

अटकेची तयारी सुरु असतानाच माणिकराव कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांना आयसीयूमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आलं आहे. सहाव्या माळ्यावरील 609 वॉर्डच्या आयसीयूत ते दाखल आहेत.

 

अजितदादांच्या नेत्यांचा प्रताप सरकारच्या डोक्याला ताप

 

शिवसेना आणि भाजप सरकारमध्ये अजित पवारांच्या समावेशामुळं युती सरकारची महायुती झाली. सरकारला मोठं बहुमत मिळाल्यानं सरकारला स्थैर्यही आलं. पण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर झालेल्या वेगवेगळ्या आरोपांमुळं सरकारची वेळोवेळी अडचण झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमुळं निर्माण झालेल्या वादाने सरकारच्या प्रतिमेवरही परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे.

 

माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्य करायचे माफी मागायचे आणि पुन्हा दुसरं वादग्रस्त वक्तव्य करायचे, पुन्हा वाद ओढवून घ्यायचे… सरकारनं त्यांच्या चुकांवर पांघरुण घालण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण कोकाटे काही माघार घ्यायला तयार नव्हते. यावर कळस म्हणजे विधिमंडळात कामकाज सुरु असताना कोकाटे महाशयांनी मोबाईलवर रम्मीचा डाव मांडला. जेव्हा त्यावरुन गदारोळ झाल्यावर त्यांनी नेहमीच्या स्टाईलनं सारवासारव केली.

 

सरकारच्या प्रतिमेचं जे काही व्हायचं होतं ते झालंच शेवटी माणिकरावांना घरचा रस्ता दाखवण्याऐवजी क्रीडामंत्रिपद दिलं. पण वाद आणि माणिकराव हे समीकरण झालं होतं. घराच्या जुन्या प्रकरणात माणिकरावांना शिक्षा झाली. आता त्यामुळं सरकारच्या प्रतिमेवर आणखी विपरीत परिणाम झाला…..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -