राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागात एसटीच्या अपघातास जिल्ह्यातील ७७ ब्लॅकस्पॉट कारणीभूत ठरले आहेत. यंदा एसटीचे एकूण ९३ अपघात घडले असून, त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
सुमारे ७० प्रवासी जखमी झाले आहेत. प्रतिलाख किलोमीटरमागे अपघातांचे प्रमाण ०.१५ इतके नोंदवले गेले आहे. विशेष म्हणजे एकूण अपघातांपैकी ५० टक्के अपघातात चालकाला जबाबदार ठरविण्यात आल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील कागल आगारात सर्वाधिक १३ ब्लॅकस्पॉट आहेत. अपघातांच्या कारणांचा आढावा घेता, चालकांची चूक, मोठ्या वाहनांचा सहभाग ही प्रमुख कारणे समोर आली आहेत. पोलिसांच्या प्राथमिक माहितीत, सुमारे ५० टक्के अपघात चालकांच्या चुकांमुळे घडल्याचे नोंदले गेले असून, ३० अपघातांमध्ये त्रयस्थ वाहनांचा सहभाग असल्याची नोंद आहे.
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामंडळाकडून उपाययोजनेचा भाग म्हणून ११३ चालकांचे उजळणी (रिफ्रेशर) प्रशिक्षण घेण्यात आले आहे. दरम्यान, एसटीच्या अपघातास केवळ चालक जबाबदार आहे, असे नाही.
अरुंद रस्त्यासह अन्य कारणेही त्याला जोडली गेली आहेत. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी एसटी प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला ब्लॅकस्पॉटची माहिती पाठवून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची सूचना केली होती. रस्ता रुंदीकरण, साईनबोर्ड लावणे, संरक्षक कठडे बांधणे, स्पीड ब्रेकर तयार करणे, प्रकाशमान खुणा लावण्याबाबत कळविले होते. धोकादायक प्रकार
धोकादायक वळण, अरुंद रस्ता, धोकादायक चढ व अरुंद रस्ता, वर्दळीचा चौक, अरुंद पूल, अरुंद मोरी, वाहतूक कोंडी, रस्ता क्रॉसिंग, तीव्र उतार, साइडपट्ट्या अपुऱ्या, ऊस वाहतूक कोंडी, आंधळे वळण, वळणाचा रस्ता व फाटा, रस्ता कच्चा असल्याने पावसाळ्यात गाडी घसरणे, संरक्षक कठडे नसणे, झाडीमुळे पुढील रस्ता न दिसणे, गाडीला टर्न न बसणे, वळणाचा रस्ता व फाटा, एस आकाराचे वळण, यू आकाराचे वळण.
‘एसटीचा अपघात होऊ नये, याकडेच आमचा कटाक्ष असतो. त्यासाठी सर्व चालकांना प्रशिक्षण दिले जाते. रस्ता सुरक्षितता अभियानांतर्गत चालकांचे प्रबोधन केले जाते. येत्या एक ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान सुरक्षितता अभियान होत आहे. त्यातही जनजागृती करणार आहोत. तसेच जे चालक विनाअपघात सेवा करतात, त्यांचा सत्कार २६ जानेवारी करणार आहोत.
– अभय देशमुख,
विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग जिल्ह्यातील आगारनिहाय ब्लॅकस्पॉट संख्या
कोल्हापूर (मध्यवर्ती बसस्थानक) – …….. ११
संभाजीनगर – ………………………….. ६
कागल – ………………………………. १३
इचलकरंजी – ………………………….. ७
गडहिंग्लज – ………………………….. १२
गारगोटी – ……………………………… ३
कुरुंदवाड – …………………………….. ८
मलकापूर – …………………………….. १
चंदगड – ………………………………. १०
आजरा – ……………………………….. ४
गगनबावडा – …………………………… २
राधानगरी – १०






