टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार कामगिरी करत सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विक्रमी विजय नोंदवला. क्रिकेटप्रेमी हा ऐतिहासिक विजय साजरा करत असतानाच एक वाईट बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघाला संथ गोलंदाजी केल्याने चांगलीच शिक्षा मिळाली आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे भारतीय संघाला दंड ठोठावण्यात आला आहे. टीम इंडियाला मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतून एक गुण वजा केला जाईल. याआधी इंग्लंड दौ-यामध्ये टीम इंडियाला गुण कमी होण्याचा फटका बसला आहे.
सेंच्युरियन कसोटीत स्लो ओव्हर रेटमुळे कसोटी चॅम्पियनशिपमध्ये एक गुण गमवावा लागल्याने भारतीय संघाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आयसीसीने काल याबाबत माहिती दिली. भारतीय संघाने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकले. त्यामुळे आयसीसीच्या नियमांनुसार गोलंदाजी करणाऱ्या संघातील खेळाडूंना प्रत्येक षटकासाठी २० टक्के दंड आकारण्यात आला. अमिराती आयसीसी एलिट पॅनेलचे मॅच रेफरी अँड्र्यू पायक्रॉफ्ट यांनी याबाबत निर्णय घेतला. भारत लक्ष्यापेक्षा एक षटक टाकण्यात कमी पडल्याने दंड ठोठावण्यात आल्याचे पायक्रॉफ्ट यांनी सांगितले.