टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि ओपनर रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत रोहित शर्माला अश्रू अनावर झाल्याचं दिसत आहे. रोहित शर्मा या व्हिडीओत खूपच भावुक झाल्याचं दिसून येत आहे. त्याला कारण ठरलं ते मुलगी समायराच्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन.. या कार्यक्रमात रोहित शर्माला भावुक झाला. रोहित शर्मा या कार्यक्रमात देशभक्ती गीत ए मेरे वतन के लोगो हे गाणं ऐकून इमोशनल झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. इतकंच काय तर त्याला अश्रू थांबवणं कठीण झालं. रोहित शर्माने या वेळी स्वत:ला कसं बसं सावरण्याचा प्रयत्न केला. रोहित शर्मा अनेकदा देशभक्तीवरील गाणं ऐकून भावुक झाल्याचं दिसून आलं आहे. भारताने टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्मा रडला होता. इतकंच काय तर वनडे वर्ल्डकप 2023 अंतिम सामना आणि 2019 वनडे वर्ल्डकप उपांत्य फेरी गमावल्यानंतरही रोहितला अश्रू आवरणं कठीण झालं होतं.
रोहित शर्माने टी20 आणि टेस्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता फक्त वनडे सामने खेळत आहे. ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण अप्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत त्याने दमदार कामगिरी केली. त्याने या खेळीच्या जोरावर आयसीसी वनडे क्रमवारीत प्रथम स्थान पटकावलं आहे. 2025 या वर्षाच्या अखेरपर्यंत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर कायम असेल हे पक्कं आहे. दुसरीकडे विजय हजारे ट्रॉफीतही रोहित शर्माने फॉर्म दाखवून दिला. त्याने सिक्किमविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकलं. पण उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नाही. पहिल्याच चेंडूवर तंबूत परतावं लागलं.
रोहित शर्मा उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात काही खास करू शकला नसला तरी संघाने चांगली कामगिरी केली. मुंबईने उत्तराखंडला 51 धावांनी पराभूत केलं. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 331 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना उत्तराखंडचा संघ 280 धावा करू शकला. रोहित शर्मा आता पुढच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत सांगणं कठीण आहे. कारण बीसीसीआयने टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला विजय हजारे ट्रॉफीत किमान 2 सामने खेळण्याची अट घातली आहे. रोहित शर्मा सध्या दोन सामने खेळला आहे. आता पुढच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत शंका आहे. जर तसं झालं नाही तर रोहित शर्मा थेट न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मैदानात उतरेल






