कसबा बावडा येथील संकपाळ नगरमध्ये रविवारी रात्री दोन मंडळांतील वर्चस्ववादाला तोंड फुटले आणि हाणामारी झाली. यामध्ये करण मोरे हा तरुण जखमी झाला. डोक्याला दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
संकपाळनगरातील दोन मंडळांत काही दिवस वाद सुरू आहे. यातून काही जण रात्री बाराच्या सुमारास जय शिवराय मित्र मंडळाजवळ जमले. काठ्या, दगड घेऊन काही जण एकमेकांवर धावून गेले. यामध्ये करण मोरे जखमी झाला. त्याला स्थानिक नागरिकांनी सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमाव पांगवला.
मंडळातील एकाने आपल्या मोबाईवर एक स्टेटस लावला होता. या स्टेटसची दोन्ही मंडळांत चर्चा झाली होती. त्याने लावलेलला स्टेटस नेमका कोणासाठी होता यावरून धुसफूस झाल्याचे घटनास्थळी सांगण्यात आले. केवळ स्टेटसवरून हाणामारीपर्यंत गेलेल्या या प्रकाराने तरुणायातील ही नवी खुन्नस चव्हाट्यावर आली आहे.