Sunday, February 15, 2026
Homeमहाराष्ट्र"तुमची लोकल आमचा जीव घेतेय!" 'धर्मवीर' फेम अथर्व वगळचे मुख्यमंत्र्यांना जळजळीत पत्र.

“तुमची लोकल आमचा जीव घेतेय!” ‘धर्मवीर’ फेम अथर्व वगळचे मुख्यमंत्र्यांना जळजळीत पत्र.

डोंबिवली येथील रहिवासी असलेल्या आणि १२ वीचा पहिला पेपर देण्यासाठी उपनगरीय रेल्वेगाडीने कळवा येथे निघालेल्या सोहम कटरे या १८ वर्षाच्या परीक्षार्थीचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला.

 

या अपघातानंतर आता प्रवासी, विविध संघटनांकडून रेल्वेतील गर्दीविषयी प्रश्न विचारले जात आहे.

 

ठाण्यातील एका अभिनेत्यानेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून प्रवासी म्हणून होणारा त्रास पत्रात मांडला. चित्रपटाच्या शूटिंग, महाविद्यालयात जाताना रेल्वे प्रवासा दरम्यान येणाऱ्या अडचणी या अभिनेत्याने पत्रात मांडल्या आहेत.

 

डोंबिवली येथे राहणाऱ्या सोहम कटरे या परिक्षार्थीचा कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानका दरम्यान परिक्षा केंद्रावर जाताना मृत्यू झाला. उपनगरीय रेल्वेगाडीतील गर्दीमुळे तोल जाऊन सोहमचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रवासी संघटनांकडून केला जात आहे. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर प्रवासी संघटनांनी सोहमला श्रद्धांजली देखील वाहिली. त्याच्या मृत्यूनंतर रेल्वे अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

 

दरम्यान, शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारीत धर्मवीर चित्रपटात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बालपणाची भूमिका करणाऱ्या अर्थव जयेश वगळ या अभिनेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे.

 

काय म्हटले पत्रात

 

अथर्व याने त्याच्या पत्रात म्हटले की, डोंबिवली येथील १८ वर्षीय विद्यार्थी सोहम सचिन कटरे याला कळवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमधून पडून आपला जीव गमवावा लागल्याच्या दुःखद घटनेबद्दल मी हे पत्र खोलवर दुःख आणि गंभीर चिंतेने लिहित आहे. सोहम सकाळी बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी त्याचे परीक्षेचे साहित्य घेऊन घरी निघाला होता आणि दुर्दैवाने तो मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दीचा बळी पडला हे हृदयद्रावक आहे. या घटनेने पुन्हा एकदा मध्य रेल्वे मार्गावरील जीवघेण्या गर्दीचे प्रमाण अधोरेखित केले आहे आणि हे लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे की पश्चिम आणि हार्बर मार्गावरही दररोज अशाच धोकादायक गर्दीचा सामना करावा लागतो.

 

मी अथर्व वगळ, विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयातील एक विद्यार्थी तथा मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, वेब सीरीज व जाहिरात क्षेत्रात काम करणारा एक अभिनेता ही आहे. ठाण्यात वास्तव्यास आहे आणि मी दररोज अशाच गर्दीच्या आणि धोकादायक परिस्थितीत महाविद्यालय व शुटिंगला जाण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी प्रवास करतो. माझ्यासारखेच, हजारो विद्यार्थी दररोज मुंबईतील जीवघेण्या गर्दीच्या लोकल ट्रेनमधून फक्त कॉलेज, शाळा आणि कोचिंग क्लासेसमध्ये जाण्यासाठी प्रवास करतात.

 

बोर्ड परीक्षेच्या काळात, ही गर्दी आणखी वाढते, ज्यामुळे प्रवास अत्यंत असुरक्षित होतो, विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी वेळेवर परीक्षा केंद्रांवर पोहोचणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी. महत्वाची बाब म्हणजे याबाबत मी मागील विनंती आधीच सादर केली आहे..

 

मी हे देखील अधोरेखित करू इच्छितो की , अशा दुर्दैवी अपघातांना रोखण्यासाठी मी यापूर्वी रेल्वे प्रशासनाला लेखी विनंती सादर केली आहे. तथा रेल्वे प्रशासनाला ईमेल पाठवून ही त्या पत्रात, मी विनंती केली होती की सर्व उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे (मेट्रो रेल्वे सिस्टीमसारखे) असले पाहिजेत जेणेकरून दरवाजे फक्त स्थानकांवरच उघडतील आणि बंद होतील, ज्यामुळे चालत्या गाड्यांमधून पडून होणाऱ्या मृत्यूंमध्ये व दुर्घटना मध्ये लक्षणीय घट होईल.दुर्दैवाने, आधी ही चिंता व्यक्त केल्यानंतरही, अशा दुःखद घटना घडत राहतात.

 

मुख्य विनंती (तातडीची कारवाई आवश्यक)

 

डोंबिवलीतील विद्यार्थी सोहमच्या गर्दीमुळे झालेल्या दुःखद मृत्यूनंतर, सेंट्रल लाईन, वेस्टर्न लाईन आणि हार्बर लाईन रेल्वेने ‘विशेष परीक्षा’ गाड्या चालवल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्यांसाठी महिला राखीव डब्ब्या प्रमाणे दररोज १-२ कोच राखीव ठेवावेत, विशेषतः बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी याची खबरदारी कृपया घ्यावी.

 

सुचवलेले उपाय

 

१. बोर्ड परीक्षेच्या काळात तिन्ही मार्गांवर विशेष लोकल गाड्या चालवल्या पाहिजेत.

२. विद्यार्थ्यांसाठी दररोज १-२ कोच / रेल्वे डब्बे राखीव ठेवावेत (महिला आणि रेल्वे कर्मचारी कोचसारखे).

३. गर्दीमुळे प्रवाशांना पडू नये म्हणून मेट्रो रेल्वेसारखेच सर्व उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे लागू करावेत.

४. विद्यार्थी राखीव डब्यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस तैनात करावेत तसेच परीक्षेच्या वेळेत प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा आणि रेल्वे कर्मचारी तैनात करावेत.

५. विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये सुरक्षितपणे चढता यावे आणि प्रवास करता यावा यासाठी योग्य घोषणा आणि मार्गदर्शन सुनिश्चित कराव्यात.

 

मा. महोदय ही केवळ एक विनंती नाही, तर निष्पाप जीवितहानी टाळण्यासाठी एक आवश्यक पाऊल आहे. परीक्षा देणारा विद्यार्थी तसेच रोज सकाळी कामनिमित्ताने , नोकरीनिमित्ताने बाहेर पडणारा व्यक्ती हा सुरक्षितपणे आपल्या घरी परतला पाहिजे. मी तुम्हाला या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन या व्यवस्था त्वरित अंमलात आणण्याची नम्र विनंती करतो. मा. महोदय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण याची गंभीर दखल घ्यावी तसेच सबंधिताना आवश्यकत्या उपाययोजना कराव्यात व सूचना द्याव्यात ही नम्र विनंती.

 

अशा आशयाचे पत्र इमेल द्वारे अथर्व याने मुख्यमंत्री कार्यालय, रेल्वे मंत्री, मध्य रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक (सीजीएम), मध्य रेल्वे३) मुख्य महाव्यवस्थापक (सीजीएम), पश्चिम रेल्वे, मुख्य महाव्यवस्थापक (सीजीएम), हार्बर मार्ग, यांना पाठविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -