बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया १७ फेब्रुवारीपासून ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे
पालकांना १० मार्चपर्यंत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. ही प्रक्रिया राबविण्याबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी दिली आहे.
आरटीई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. वंचित घटकांतील बालकांमध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), (क), (ड) इतर मागासवर्ग (ओबीसी), विशेष मागासवर्ग (एसबीसी), आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, एचआयव्ही बाधित किंवा प्रभावित बालक, अनाथ बालके, दिव्यांग बालके अथवा कोविड प्रभावित बालकांचा समावेश होतो.
तर, आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. बालकांच्या पालकांना त्यांच्या निवासस्थाच्या ठिकाणापासून एक किमी पेक्षा कमी अंतरावरील शाळा (हवाई अंतर) आरटीई पोर्टलवर दिसतील. या अनुषंगाने प्रक्रियेकरिता विचारपूर्वक १० शाळांची निवड करावी. तसेच ज्या बालकांच्या प्रवेशासाठी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकासाठी पुन्हा अर्ज करता येणार नसल्याचे शिक्षण संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आले आहे.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडण्यात यावीत, अचूक माहिती भरण्यात यावी, तसेच विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी. प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्रांची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करुन समस्येचे निराकरण करता येईल, असेही शिक्षण संचालनालयामार्फत कळविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन सोडत काढण्याकरिता दिनांक निश्चित केला जाणार आहे. पालकांनी अर्ज भरताना जी आवश्यक कागदपत्रे नोंदवली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती प्रवेशासाठी तयार ठेवणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता असून, पालकांनी शेवटच्या क्षणाची गर्दी टाळून लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३२३ शाळांमध्ये ५ हजार ९३९ जागा उपलब्ध
मुंबई परिक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळासाठी २५२ शाळांमध्ये ४ हजार ५५८ जागा आहेत. इतर मंडळांसाठी ७१ शाळांमध्ये १ हजार ३८१ जागा आहेत. अशा एकूण ३२३ शाळांमधे ५ हजार ९३९ राखीव जागा आहेत.





