हातात पॅड घेऊन परीक्षा केंद्रावर दाखल झालेल्या या आहेत कळमनुरी तालुक्यातील धानोरा गावात राहणाऱ्या 61 वर्षीय आजी फेमिदा बेगम निसार खां पठाण. त्यांनी आज कळमनुरी येथील महात्मा फुले या विद्यालयात जाऊन इयत्ता 10ची परीक्षा दिली आहे.
त्यांचं वय झालं तरी पण मनातली त्यांची शिकण्याची इच्छा मात्र अजूनही तरुणच आहे. घरातली कामं, जबदाऱ्या, नातवंड सांभाळत, अभ्यास आणि सराव करत त्यांनी आज 10वी चा पहिला मराठीचा पेपर सोडवला आहे.
शिक्षणासाठी वय नाही तर जिद्द लागते, आत्मविश्वास असेल तर अवघड गोष्ट ही सोप्पी होते हेच यातून फेमिदा बेगम यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्या शिकण्याच्या जिद्दीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कळमनुरी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात येऊन फेमिदा बेगम यांनी दहावीचा मराठीचा पेपर सोडवला आहे. या वयातही त्यांनी अभ्यास केला, त्यांना शिक्षणाची आवड आहे, त्यांची शिक्षणाबद्दलची तळमळ बघून, ज्यांचं अर्धवट शिक्षण सुटलं आहे, ज्यांना शिक्षण पूर्ण करायची इच्छा आहे, अशा व्यक्तींना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.






