काखे (ता. पन्हाळा) येथे अनैतिक संबंधातून एका विवाहितेचा दिराने घरात घुसून निर्घृण खून केला. त्याने विवाहितेवर धारदार चाकूने सपासप वार केले. काल दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला.
पूजा अविनाश दाभाडे (वय ३३, रा. काखे) असे मृत महिलेचे नाव आहे. हल्ल्यानंतर दीर सुरेश मधुकर दाभाडे (३५, रा. काखे) घटनास्थळावरून पसार झाला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे.
या घटनेची कोडोली पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : हे दोघे कऱ्हाड येथे सहा महिने राहत होते. घरच्या लोकांनी समजूत काढून पूजाला तीन महिन्यांपूर्वी काखेमध्ये आणले होते.
पूजा काल दुपारी एकटीच घरी होती. त्यावेळी सुरेश तेथे आला. जुन्या कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात सुरेशने धारदार चाकूने पूजावर सपासप वार केले. पूजाचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावून आल्यावर सुरेश घटनास्थळावरून तातडीने पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजाला स्थानिकांनी तातडीने कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
सुरेशवर वारणानगर कामगार कॉलनीतील चोरीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आधीच त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या, तर आज हा अनर्थ घडला नसता, असा आरोप करत नातेवाइकांनी रुग्णालयातच पोलिसांवर खापर फोडले. हल्लेखोरास अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाइकांनी घेतल्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हल्लेखोराच्या शोधासाठी दोन विशेष पथके रवाना केली आहेत. यावेळी शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन नातेवाइकांशी संवाद साधला. सहायक निरीक्षक चेतन मसुटगे तपास करीत आहेत.
