Tuesday, April 28, 2026
Homeकोल्हापूरपन्हाळा ग्रामीण रुग्णालयात ड्युटीवरच डॉक्टर मद्यधुंद

पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात ड्युटीवरच डॉक्टर मद्यधुंद

पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने आरोग्य यंत्रणेचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. ड्युटीवर असलेला वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर टोणपे चक्क दारूच्या नशेत असल्याने एका अत्यवस्थ रुग्णावर उपचार करायला कुणी नसल्याने कोल्हापूरला हलवण्याची वेळ आली.

 

या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

शनिवारी रात्री एकाला घरात अचानक चक्कर आली. नातेवाईकांनी रुग्णाला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ड्युटीवर असलेला वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर टोणपे हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळले. या डॉक्टरला धड बोलताही येत नव्हते. त्यामुळे त्याच्याकडून उपचार होणे अशक्य होते. अखेर स्टाफ नर्स आणि वॉर्डबॉय यांनी प्राथमिक उपचार सुरू केले. या प्रकाराची माहिती स्टाफ नर्सने रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिवंत यांना दूरध्वनीवरून दिली. त्यांनी दुसरा डॉक्टर पाठवतो, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात बराच वेळ कोणीही डॉक्टर रुग्णालयात पोहोचला नाही. शेवटी 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून रुग्णाला कोल्हापूरला हलवण्यात आले.

 

डॉ. टोणपे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश

 

पन्हाळा : पन्हाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटीवर असतानाच डॉक्टर दिगंबर टोणपे हे मद्यधुंद अवस्थेत आढळल्याप्रकरणी गंभीर दखल घेत कोल्हापूर आरोग्य मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी त्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कर्तव्यावर असताना मद्यपान करून रुग्णसेवेत अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

 

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील कार्यवाहीसाठी मुंबईतील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिवांकडे सादर करण्यात आला आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून पन्हाळा येथे भव्य रुग्णालय आणि कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने उभारली आहेत; मात्र या निवासस्थानांमध्ये एकही डॉक्टर राहत नसल्याचे समोर आले आहे. सर्व डॉक्टर आणि कर्मचारी आपापल्या घरून ये-जा करतात, असे स्वतः अधीक्षकांनी मान्य केले आहे. रुग्णालयालगत सर्व सुविधा असतानाही डॉक्टर तिथे राहत नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, ही लाजीरवाणी बाब आहे. याप्रकरणी संबंधित मद्यधुंद डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी आणि सर्व कर्मचार्‍यांना निवासस्थानी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी आता पन्हाळावासीयांकडून जोर धरत आहे.

 

सुविधांचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष

 

या रुग्णालयात सध्या एक्स-रे आणि ईसीजी यांसारखी महत्त्वाची यंत्रणा बंद असल्याने रुग्णांना उपचाराविना कोल्हापूरला धाव घ्यावी लागत आहे. औषधांचा तुटवडा आणि कर्मचार्‍यांची अरेरावीची भाषा यामुळे सामान्यांचे हाल होत असून, कर्तव्यावर असताना मद्यपान करण्यासारख्या गंभीर प्रकारांमुळे रुग्णालयाची प्रतिमा मलिन होत आहे. आरोग्यसेवा देण्याऐवजी हे रुग्णालय केवळ ‘रेफरल सेंटर’ बनले असून, जिल्हाधिकार्‍यांनी या अनागोंदी कारभाराची तातडीने दखल घेऊन सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -