Homeकोल्हापूरकोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

कोल्हापूर शहरालगतच्या शिंगणापूर मुख्य मार्गावरील खांडसरी नाका परिसरात एका तरुणाला बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच दत्तनगरमधील काही महिलांनी पहाटे चंबुखडी टाकी परिसरात बिबट्या दिसल्याचा दावा केला आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने बिबट्याच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे.

 

सतीश तानाजी पाटील (वय ३६, रा. हणमंतवाडी, ता. करवीर) हे त्यांचे मोठे बंधू हर्षद पाटील यांच्यासोबत रात्री ट्रॅक्टरमधून हणमंतवाडीकडे परतत होते. खांडसरी नाका परिसरातून पुढे गेल्यानंतर योगेश माने यांच्या ट्रेडर्सच्या गोदामाजवळ बिबट्याने ट्रॅक्टरसमोरून उडी मारून गोदामाच्या मागील बाजूस असलेल्या शेतात प्रवेश केल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले.

 

दरम्यान, शिंगणापूर मार्गावरील दत्तनगरमधील काही महिला पहाटे चारच्या सुमारास फिरण्यासाठी गेल्या असता, त्यांना चंबुखडी टाकी परिसरात बिबट्या दिसल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा बिबट्या लक्षतीर्थ वसाहत किंवा फुलेवाडीच्या दिशेने गेला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

वनविभागाच्या पथकाने सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास चंबुखडी टाकीच्या टेकडीपासून सुमारे अडीच किलोमीटरच्या परिसरात ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम राबविली. मात्र, या मोहिमेत बिबट्या आढळून आला नाही. मध्यरात्री एकनंतर पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

या मोहिमेत उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, वनपाल आप्पासाहेब बुरटे, वनरक्षक विदेश तांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुपर्यवेक्षक अमित कुंभार तसेच वन्यजीव बचाव पथकाचे आशुतोष सूर्यवंशी, राकेश शिखरे आणि वैभव आवळे सहभागी झाले.

 

“बिबट्याच्या शोधासाठी तातडीने पथके पाचारण करण्यात आली आहेत. ड्रोनच्या सहाय्याने परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे,” अशी माहिती वनपाल आप्पासाहेब बुरटे यांनी दिली. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -