सध्या उन्हाचा पारा वाढल्याने थंड आणि शीतपेय घेण्यासाठी, पिण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसून येते. बाजारात अनेक कुल्फी (kulfi ) आणि ब्रँडेड कंपनीच्या आईसक्रीमही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून एका ब्रँडेड कंपनीच्या कुल्फीत भेसळ असल्याचे उघडकीस आणले आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळयुक्त कुल्फीविरोधात कारवाई करत तब्बल 1 हजार 856 पॅकेट्स कुल्फी जप्त केली आहे. त्यामुळे, ऐन उन्हाळ्याच्या सिझनमध्ये थंडगार, शीतपेय विकणाऱ्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे हे पॅकेट्स नामांकित कंपनीचे असून यामध्ये वनस्पती तेल आणि फॅटचा वापर करण्यात आला असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आलीय. या कारवाईच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
अन्नसुरक्षा आणि मानदे कायद्यानुसार आईस्क्रीम आणि कुल्फी या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे वनस्पती तेल किंवा फॅट वापरण्यास सक्त मनाई आहे. मात्र, तपासणी दरम्यान संबंधित कुल्फींमध्ये अशा घटकांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली. दरम्यान, जप्त साठ्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिकारी बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनमार्फत उत्पादीत आणि पुरवठा होणार्या कुल्फींमध्ये भेसळ होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, शहरातील वितरकांना माल पुरवठा करणार्या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कुल्फीचा साठा आढळून आला आणि तो तात्काळ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीला खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियमभंग सिद्ध झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.





