उन्हाळा सुरू झाला की उकाडा, ऊन आणि घाम यांचा त्रास वाढतोच, पण त्यासोबत मोबाइल गरम होण्याची समस्या देखील वाढते. अनेक स्मार्टफोन गरम हवामानामुळे पटकन तापतात. फोन जास्त गरम झाला की तो हळू चालू लागतो, बॅटरी लवकर संपते आणि दीर्घकाळात फोनचं नुकसानही होऊ शकतं.
पण काही सोप्या सवयी लावल्या तर ही समस्या सहज कमी करता येते.
स्क्रीन ब्राइटनेस नियंत्रणात ठेवा
मोबाइलमधील सर्वात जास्त वीज खर्च करणारा घटक म्हणजे त्याची स्क्रीन. स्क्रीनचा ब्राइटनेस जास्त ठेवला तर बॅटरीवर अधिक ताण येतो आणि फोन पटकन तापू लागतो. म्हणूनच फक्त गरजेनुसारच ब्राइटनेस ठेवणे आवश्यक आहे. विशेषतः उन्हात फोन वापरताना ब्राइटनेस अनावश्यकपणे खूप वाढवणे टाळावे.
एअरप्लेन मोडचा वापर करा
नेटवर्कचा सिग्नल कमी असेल, तर फोन सतत नेटवर्क शोधत राहतो आणि त्यामुळे डिव्हाइस गरम होऊ शकते. अशा परिस्थितीत काही काळासाठी एअरप्लेन मोड सुरू केल्यास फोनवरील ताण कमी होतो आणि तापमान घटण्यास मदत होते. विशेषतः प्रवास करताना हा उपाय अतिशय फायदेशीर ठरतो.
ओव्हरचार्जिंग टाळा
फोनची बॅटरी पूर्ण भरल्यानंतर चार्जरला जोडून ठेवणं टाळा. असं केल्याने बॅटरीवर अनावश्यक ताण येतो आणि फोन तापू शकतो. शक्य असल्यास बॅटरी 90 ते 95 टक्क्यांपर्यंत चार्ज झाल्यावर चार्जर काढणं अधिक योग्य ठरतं. यामुळे बॅटरीचं आयुष्य वाढण्यास मदत होते.
जाड बॅक कव्हर काढून वापरा
जाड रबर किंवा प्लास्टिकच्या कव्हरमुळे फोनातील उष्णता बाहेर निघू शकत नाही, त्यामुळे फोन आतून अधिक तापू शकतो. फोन गरम जाणवत असल्यास काही काळासाठी बॅक कव्हर काढून ठेवणे फायदेशीर ठरू शकते.
थेट उन्हात वापरणं टाळा
ऊनात फोन वापरल्यानं त्याचं तापमान झपाट्यानं वाढतं. स्क्रीनही स्पष्ट दिसण्यासाठी ब्राइटनेस वाढवावा लागतो, ज्यामुळे हीटिंग वाढतं. त्यामुळे शक्यतो सावलीत किंवा थंड ठिकाणी फोन वापरण्याचा प्रयत्न करा.
या सोप्या आणि छोट्या वापराच्या या सवयी आत्मसात केल्या तर तुमचा स्मार्टफोन उन्हाळ्यातही सुरक्षित, थंड आणि विनाअडथळा काम करू शकतो.





