कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षकपदी आज गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची नियुक्ती झाली. येथील पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांची पदोन्नतीने गडचिरोली परीक्षेत्रात उपमहानिरीक्षकपदी बदली झाली.
याशिवाय राज्यातील आणखी आठ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला.
नूतन अधीक्षक नीलोत्पल मूळचे बागलपूर (बिहार) चे आहेत. ते २०१४-१५ च्या ‘आयपीएस बॅच’चे महाराष्ट्र केडरमधील अधिकारी आहेत. ते भुसावळ, जळगाव येथे अपर पोलिस अधीक्षक होते. त्यानंतर ते मालेगावचे पोलिस अधीक्षक होते. नागपूर आणि मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदाची धुरा सांभाळली आहे. त्यानंतर नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांची बदली झाली. त्यांनी त्या जिल्ह्यातील नक्षलवाद कमी करण्यासाठी त्रिसूत्री राबविली.
गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानासाठी ‘सी-६०’ (C-60) कमांडो दलाच्या माध्यमातून धडक कारवाया केल्या. नक्षलग्रस्त भागातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी ‘एक गाव, एक वाचनालय’ ही अभिनव संकल्पना राबविली.
नक्षली प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी जनजागृतीचे मेळावे आणि विकासात्मक कामांवर भर दिला. त्यांना नक्षलविरोधी अभियानातील कामगिरीबद्दल ‘तरुण तेजांकित’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दरम्यान, अधीक्षक योगेश कुमार यांनी २२ मे २०२५ला जिल्ह्यात पदभार घेतला होता. पदोन्नतीने त्यांची बदली झाली. ते दोन महिने बदलीच्या प्रतीक्षेत होते.
अन्य बदल्या अशा (मूळ व बदलीचे ठिकाणी अनुक्रमे)
सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी- सांगली पोलिस अधीक्षक
पुण्याचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे – सातारा पोलिस अधीक्षक
पुण्याचे दुसरे पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे- वाशीम पोलिस अधीक्षक
धुळ्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे – जळगावचे पोलिस अधीक्षक
जळगावचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी- पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक





