ओपनर संजू सॅमसन याने केलेल्या नाबाद आणि झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 48 व्या सामन्यात होम टीम दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध एकतर्फी विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने चेन्नईसमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईने हे आव्हान 15 बॉलआधी पूर्ण केलं. दिल्लीने 17.3 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. चेन्नईने अशाप्रकारे 2 गुणांची कमाई केली. चेन्नई अशाप्रकारे 10 गुण पूर्ण करणारी सहावी टीम ठरली. चेन्नईचा हा या मोसमातील पाचवा आणि दिल्ली विरुद्धचा दुसरा विजय ठरला. तर दिल्लीचा हा सहावा पराभव
दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अक्षरचा हा निर्णय चुकीचा ठरला. दिल्लीला 8 च्या रनरेटनेही धावा करता आल्या नाहीत. मात्र अखेरच्या क्षणी ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवी या जोडीने केलेल्या निर्णायक खेळीमुळे दिल्ली 150 पार मजल मारता आली. समीर रिझवी याने नाबाद 40 धावा केल्या. तर ट्रिस्टनने 38 रन्सचं योगदान दिलं. चेन्नईच्या गोलंदाजांसमोर दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 155 धावांपर्यंत पोहचता आलं. चेन्नईकडून नूर अहमद याने 2 विकेट्स मिळवल्या. तसेच गुरजनप्रीत सिंह, जेमी ओव्हरटन, मुकेश चौधरी आणि अकील हौसेन या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
चेन्नईसमोर 156 धावांचं आव्हान
चेन्नईची विजयी धावांचा पाठलाग करताना अडखळत सुरुवात झाली. दिल्लीने चेन्नईला 2 झटके दिले. लुंगी एन्गिडी याने कॅप्टन ऋतुराज गायकवाड याला आऊट करत चेन्नईला पहिला झटका दिला. ऋतुराजला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ऋतुराजने 6 धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेल याने चेन्नईच्या सातव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर उर्विल पटेल याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. उर्विलने 9 बॉलमध्ये 17 रन्स केल्या. विकेटकीपर केएलने उर्विलला स्टंपिंग केलं. त्यामुळे चेन्नईची 2 आऊट 45 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे इथे आणखी एक झटपट विकेट गेली असती तर चित्र बदललं असतं. मात्र संजू सॅमसन आणि कार्तिक शर्मा या जोडीने तसं काहीच होऊन दिलं नाही.
तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
संजू आणि कार्तिक या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी करुन चेन्नईला विजयी केलं. या दोघांनी 66 बॉलमध्ये नॉट आऊट 114 रन्सची पार्टनरशीप केली. चेन्नईसाठी संजूने सर्वाधिक धावा केल्या. संजूने 52 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 7 फोरसह नॉट आऊट 87 रन्स केल्या. तर कार्तिकने 31 चेंडूत 2 सिक्स आणि 4 फोरसह नाबाद 41 धावा केल्या. चेन्नईने अशाप्रकारे 17.3 ओव्हरमध्ये 159 धावा करुन विजय मिळवला.




