पर्यटकांना आकृष्ट करणाऱ्या मात्र देखभाल आणि व्यवस्थापनाअभावी सद्यःस्थितीत अवकळा आलेल्या आणि एक तपापासून पर्यटकांसाठी बंद झालेल्या काळम्मावाडी धरणस्थळावरील (Kallammawadi Dam) उद्यानाचा प्रस्तावित नूतनीकरण योजनेतून कायापालट होणार आहे.
प्रस्तावित योजना पर्यटन क्षेत्रातील ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ठरणारी आहे. आगामी काळात जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील एका युनिक उद्यानाची निर्मिती होणार आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून पर्यटन विकासाची नाडी ठरणारी उद्यान नूतनीकरण योजना दृष्टिपथात आली आहे.
इतकेच नव्हे, तर प्रस्तावित योजनेसाठी जिल्हा नियोजन मंडळातून सात कोटींचा आर्थिक निधीही मंजूर केला आहे. उद्यानाला पुन्हा गतवैभव मिळण्याबरोबरच राधानगरी-काळम्मावाडी-दाजीपूरच्या पर्यटन विकासासाठी ही योजना अत्यंत साहाय्यभूत ठरणार आहे.
एक वैशिष्ट्यपूर्ण उद्यान, अशी ख्याती असलेल्या या उद्यानाची १९९० मध्ये निर्मिती केली. जलतरण तलाव, बालोद्यान आदी सुविधांमुळे पर्यटकांचा ओघ वाढता राहिला. सुयोग्य व तंत्रशुद्ध देखभाल, व्यवस्थापनाअभावी उद्यान दुर्लक्षित राहिले. अखेर २०१२ मध्ये धरण सुरक्षिततेच्या कारणास्तव उद्यान पर्यटकांसाठी बंद केले.
याच उद्यानाच्या नूतनीकरण आणि पुनर्निर्मितीचा कल्पक आराखडा बनविला आहे. प्रस्तावित योजनेला प्रशासकीय मान्यता, तसेच निधीची तरतूद झाली आहे. लवकरच योजनेची निविदा काढण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.



