बुधवारी पहाटे राजधानी दिल्लीच्या मालवीय नगर येथील एका हॉटेलला भीषण आग लागली. या आगीत तब्बल २२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना आता बिहारमधून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे.
बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरा भागात असलेल्या ‘प्रसाद हॉस्पिटल’मध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर १५ ते २० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
आयसीयू (ICU) वार्डात शॉर्ट सर्किटमुळे आग
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या आयसीयू (ICU) वार्डात पहाटे ३ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. आग लागल्यानंतर काही वेळातच संपूर्ण रुग्णालयात आगीच्या ज्वाळा आणि काळा धूर पसरला. यामुळे आयसीयूत भरती असलेल्या रुग्णांचा जीव गुदमरला.
अग्निशामक दलाचे अधिकारी आर. एन. पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्हाला पहाटे ३ च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. जेव्हा आमचे पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा रुग्णालयातील परिस्थिती अत्यंत बिकट होती. संपूर्ण आयसीयू वार्डात दाट काळा धूर पसरला होता.”
खिडक्या-दरवाजे तोडून रुग्णांना काढले बाहेर
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सुमारे १२ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. फायर ब्रिगेडच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत खिडक्या आणि दरवाजे तोडून आयसीयू आणि इतर वार्डात अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढले. सुमारे २० हून अधिक रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मात्र, वाचवण्यात आलेल्या रुग्णांपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
या भीषण दुर्घटनेनंतर रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका पीडित नातेवाईकाने रडत सांगितले की, त्याचे वडील आयसीयूमध्ये भरती होते आणि या आगीत त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी माणुसकी सोडली. आग लागताच त्यांना रुग्णांना वाऱ्यावर सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला.






