Saturday, June 6, 2026
Homeमहाराष्ट्रदागिन्यांवर डोळा, निर्जनस्थळी हत्या अन् आंबेनळी दरीत फेकला मृतदेह; महिलेच्या मृत्यूची डोकं...

दागिन्यांवर डोळा, निर्जनस्थळी हत्या अन् आंबेनळी दरीत फेकला मृतदेह; महिलेच्या मृत्यूची डोकं सुन्न करणारी कहानी

सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी नातेवाईक असलेल्या महिलेचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 

या प्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या कबुलीजबाबानंतर सर्च अँड रेस्क्यू पथकाच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.

 

सुनंदा पाटील (रा. सारळ, ता. अलिबाग) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिनविरा येथील अनदर्श शेडगे आणि रितेश लोहार या दोघांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून दागिन्यांच्या लालसेतून हा खून केल्याचे समोर आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनंदा पाटील या काही दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या नातेवाईकांनी विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर मांडवा सागरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत महिलेच्या हालचाली, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासण्यास सुरुवात केली.

 

तपासादरम्यान पोलिसांचा संशय नातेवाईक असलेल्या अनदर्श शेडगे आणि रितेश लोहार यांच्यावर गेला. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. महिलेकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर डोळा ठेवून आरोपींनी तिला बोलावून घेतले. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिचा खून करण्यात आला. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह महाबळेश्वरजवळील आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून देण्यात आल्याचे तपासात उघड झाले.

 

आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सर्च अँड रेस्क्यू पथकाची मदत घेत आंबेनळी घाट परिसरात शोधमोहीम हाती घेतली. अत्यंत दुर्गम आणि धोकादायक परिस्थितीत पथकाने दरीत उतरून शोधकार्य केले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर महिलेचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आले.

 

या घटनेमुळे अलिबाग तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नातेसंबंधांनाच काळिमा फासणाऱ्या या गुन्ह्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मांडवा सागरी पोलीस पुढील तपास करीत असून आरोपींकडून गुन्ह्यातील इतर बाबींची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दागिन्यांच्या मोहापायी एका महिलेचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -