इचलकरंजी शहराला पाण्यासाठी कोणाचाही कसलाही विरोध नसलेली आणि शुध्द, मुबलक पाणी देणारी जुने दानवाड उद्भव असणारी राधाकृष्ण पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे , अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली
या योजनेच्या माध्यमातून शहराचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार आवाडे म्हणाले, इचलकरंजी शहराला सध्या कृष्णा आणि पंचगंगा या योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. या योजनेतून प्रत्यक्षात उचलले जाणारे पाणी आणि शहराला मिळणारे पाणी यामध्ये तफावत असल्याने इचलकरंजीकरांना दररोज पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यापूर्वी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कुंभोज आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी काळम्मावाडी आणि दानोळी योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला होता.
नदीकाठावरील ग्रामस्थ व शेतकर्यांच्या विरोधामुळे या योजना रद्द झाल्या. त्यानंतर अमृत योजनेअंतर्गत सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजना मंजूर केली. या योजनेलाही सातत्याने विरोध होत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता आणि सन २०५४ सालची इचलकरंजी शहराची लोकसंख्या विचारात घेऊन कोणताही विरोध होणार नाही अशी शाश्वत पाणी पुरवठा योजनेसाठी मी वर्षभरापासून पाठपुरावा केला. योजनेचा अभ्यास करीत होतो.
या दरम्यान, कर्नाटक राज्याच्या हद्दीतील कल्लोळ बंधार्यापासून दीड किलोमीटर अंतर आधी जुने दानवाड या गावच्या हद्दीत पुरातन राधाकृष्ण मंदिर परिसरातील जागा निश्चित करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या पाठपुराव्यासाठी संबंधित तिन्ही गावातील प्रमुख मंडळी, ग्रामस्थ, दोन्ही तालुक्यातील प्रमुख राजकीय मंडळी यांच्याशी संवाद साधत इचलकरंजीसाठी योजना राबविण्याबाबत मान्यता घेण्यात आली.
ग्रामस्थांचे सहकार्य
यावेळी जुने दानवाड, राजापूरवाडी व सैनिक टाकळी या गावातील सर्वपक्षीय प्रमुख मंडळी उपस्थित होती. त्यांनीही इचलकरंजीला पिण्यासाठी पाणी देण्यास कोणतीही अडचण नसल्याची ग्वाही दिली. यावेळी रावसाहेब कुंभोजे, हरीभाऊ पाटील, शिवराज तासगांवे, अनिल वडगांवे, रावसाहेब मलिकवाडे, कलगोंडा पाटील, महावीर वडगांवे, बंडू पाटील, महावीर पिरकाने, महावीर पाटील, प्रतापसिंह रजपूत, आदगोंडा पाटील, कलगोंडा पाटील, अविनाश मगदूम, दादा सांगावे, संजय कोथळी, परशराम धनगर, तात्यासो पाटील, कुमार रायनाडे आदी जुने दानवाड, सैनिक टाकळी व राजापूरवाडी येथील मान्यवर तसेच महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, प्रकाश दत्तवाडे, सतिश मुळीक, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, शेखर शहा, अजितमामा जाधव, रवी रजपुते आदींसह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.






