हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि अध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या या अधिक मासातील प्रत्येक तिथीला पूजेचे आणि दानाचे फळ हजारो पटीने जास्त मिळते.
त्यातही अधिकमासातील ‘अमावस्या तिथी’ ही अत्यंत खास आणि महत्वाची मानली जाते. ही अमावस्या पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या त्रासांतून मुक्ती मिळवण्यासाठी सुवर्णसंधी मानली जाते. पण ही अमावस्या नेमकी कधी आणि कोणत्या उपायांनी पितृदोष दूर करावा आणि पुण्य मिळवावे जाणून घेऊ.
अधिकमास अमावस्याचे धार्मिक महत्त्व
अधिक मासातील अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे. ही अमावस्या पूर्वज पूजा आणि दानधर्मासाठी विशेषतः फलदायी मानली जाते. याच दिवशी मिथुन संक्रांतीसुद्धा साजरी होणार असल्याने, या अमावस्येचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. शिवाय, या अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योगाचा शुभ संयोगही तयार होत असल्याने, ही अमावस्या अधिकच विशेष ठरते. त्यामुळे, या दिवशी केलेल्या विशेष उपाययोजनांचे फळ लवकर मिळते.
अधिकमास अमावस्या तारीख आणि तिथी
पंचांगानुसार, अधिक मासाची अमावस्या 14 जूनला दुपारी 12:19 वाजता सुरू होईल आणि 15 जूनला सकाळी 8:23 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, अधिक मासाची अमावस्या सोमवार, 15 जूनला साजरी केली जाईल. ही अमावस्या सोमवारी येत असल्यामुळे, तिला सोमवती अमावस्या देखील म्हटले जाते. सनातन धर्मात सूर्योदयाच्या वेळची तिथी म्हणजेच उदय तिथी धार्मिक कार्यासाठी श्रेष्ठ मानली जाते. 15 जूनला सूर्योदयाच्या वेळी अमावस्या आहे आणि त्या दिवशी सोमवार देखील आहे. त्यामुळे अधिकमास अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या 15 तारखेला साजरी केली जाईल.
अधिकमास अमावास्येच्या दिवशी न चुकता काय दान करावे?
या दिवशी सकाळी मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला पाण्याने भरलेले एक माठ दान करा किंवा शक्य असल्यास कुठेतरी पाणपोई सुरू करा. असे म्हटले जाते की या प्रथेमुळे भाग्य उजळते आणि भगवान विष्णूचा अनंत आशीर्वाद प्राप्त होतो. याशिवाय, या दिवशी फळे, अन्न, वस्त्र, छत्र्या आणि फॅन दान करणे देखील अत्यंत फलदायी मानले जाते.







