महापालिकेने शहरात येणाऱ्या कोल्हापूरबाहेरील वाहनांसाठी ‘प्रवेश कर’ घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेसमोर आणला आहे. हा निर्णय एकतर्फी व अन्यायकारक आहे. याला जनता दल (धर्मनिरपेक्ष), स्वाभिमाने शेतकरी संघटना, हिंदू एकता आंदोलन, कॉमन मॅन संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे.
हा निर्णय मागे न घेतल्यास संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. तसेच महापालिकेच्या या मनमानीबद्दल सर्वच स्तरातून संतापाचा सूर उमटला आहे.
जनतेला लुटण्याचा नवा फंडा: राजू शेट्टी महापालिकेने शहरात येणाऱ्या बाहेरील वाहनांवर टोल आकारण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकार आधीच ‘जीएसटी’च्या माध्यमातून जनतेकडून मोठी करवसुली करत आहे. आता
महापालिकेनेही जनतेला लुटण्यासाठी हा नवा फंडा शोधून काढला आहे. याला तीव्र विरोध आहे. जनतेवर टोलचा भार टाकण्यापेक्षा महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी आपली टक्केवारी आणि भ्रष्टाचार थांबवावा, अशी टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. तसेच या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
तुघलकी निर्णयला विरोध : दीपक देसाई
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून येणाऱ्या हिंदू भाविकांवर आणि पर्यटकांवर प्रवेश कर लादण्याचा घाट घातला जात आहे. हा निर्णय कोल्हापूरच्या जनतेस कदापि मान्य होणार नाही. यातून महापालिकेचा आणखी एक तुघलकी कारभार समोर येत आहे. या प्रवेश कराबाबत हिंदू एकताचा कायम विरोध असेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी दिला.
‘एमएच-५१’ वाहनांना वगळा : प्रवीण माणगावे
महापालिकेने ‘एमएच-०९’ वगळता सर्वच वाहनांवर प्रवेश कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ येथील ‘एमएच-५१’ च्या वाहनांनाही हा कर द्यावा लागणार आहे. जिल्ह्यांतर्गतच अशा पद्धतीने कर देणे कितपत व्यवहार्य आहे. तरी हा कर रह व्हावा, महापालिकेने अशा ठरावाला स्थगिती द्यावी, अशी मागणी जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) प्रदेश सरचिटणीस प्रवीण माणगावे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
महापालिका तोंडघशी पडेल : बाबा इंदूलकर
महापालिकेला स्वतःहून असा प्रवेश कर लावण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी असा ठराव आणल्यास ते तोंडघशी पडतील. शहरवासीयांनी यापूर्वी टोल घालविला आहे, याची जाणीव ठेवावी, असा इशारा ‘कॉमन मॅन’चे बाबा इंदुलकर यांनी दिला.
‘प्रवेश करा’ संदर्भात बैठक घेऊ : पालकमंत्री
शहराच्या विकासासाठी अशा पद्धतीने निधी उपलब्ध होत असेल, तर त्याचा विचार होऊ शकतो. हा प्रस्ताव सदस्यांनी आणला आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात बैठक घेऊ, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.





