कोल्हापूर : रंकाळ्याच्या काठावरील प्रतिष्ठित ‘शालिनी पॅलेस’चा शुक्रवारी ऑनलाइन लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी २६ कोटी ४७ लाख रुपये राखीव किंमत ठेवण्यात आली आहे. या इमारतीच्या मालकीबाबतचे वाद आणि फसव्या नोंदींचा आरोप याचा विचार करून लिलाव जाहीर करणाऱ्या एडलवाईज असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि. व ई लिलाव संस्था मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लि. या कंपन्यांना तातडीने कळवून काही बाबींचा निर्णय होईपर्यंत लिलाव पुढे चालविला जाणार नाही किंवा विक्रीचे कोणतेही अंतिम प्रमाणपत्र जारी केले जाणार नाही असे निवेदन सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना दिले आहे. २१३ कोटी २१ लाखांच्या कर्जापोटी हा लिलाव होणार आहे.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, माहिती अधिकारी कार्यकर्ते दिलीप देसाई, मोडी अभ्यासक अमित अडसुळे, रविराज कदम, राम यादव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही २९ एकर २८ गुंठे क्षेत्रफळाची शासकीय मिळकत हडप करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकृत पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून चुकीच्या नोंदी केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
इंद्रजित सावंत, दिलीप देसाई यांनी सांगितले की, शहाजी महाराजांनी १८ जून १९६८ ला महात्मा फुले विकास सोसायटीला ही जागा १६ लाख रुपयांना भाडेकरारावर दिली. नंतर हीच जागा ९९ वर्षांच्या कराराने ३० मे १९८३ ला रणजित चौगुले आणि विक्रांत चौगुले यांना भाडेपट्ट्याने देण्यात आली. या जागेवर भाडेपट्टा हक्कावर २०१३ साली ७ कोटी ६९ लाखांचा बोजा चढविण्यात आला जो २०२३ पर्यंत १० कोटी ४३ लाखांवर झाला. दरम्यान कर्ज वसुलीसाठी संबंधित संस्थेने लिलाव घोषित केला असून त्याची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मालमत्तेच्या मालकीबाबत वादग्रस्त स्थिती असल्याने हा लिलाव रोखण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मिळकतीला शहाजी महाराजांचे नाव
याबाबत इंद्रजित सावंत, दिलीप देसाई म्हणाले, छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात ही इमारत उभारण्यात आली. १७ मार्च १९५७ पर्यंत महसूल अभिलेखात तत्कालीन शासनाच्या नावे ‘श्री शालिनी पॅलेस सरकारी’ अशी नोंदलेली होती. मात्र नंतर कोणत्याही आधारभूत कागदपत्रांशिवाय महसूल अभिलेखात बदल करून या मिळकतीचे धारक म्हणून हिज हायनेस सर शहाजी महाराज छत्रपती कोल्हापूर यांचे नाव दर्शविण्यात आले. याची सखोल व स्वतंत्र दस्तऐवजांची छाननी होण्याची गरज आहे.
