Homeमहाराष्ट्ररेशनवरील धान्य घेण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ; आता 'या' तारखेपर्यंत घेता येईल रेशनवरील...

रेशनवरील धान्य घेण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येईल रेशनवरील धान्य

पुणे शहर आणि जिल्ह्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी दिलासादायक निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्याचे प्रलंबित अन्नधान्य वाटप करण्यासाठी राज्य सरकारने १५ जूनची अंतिम मुदत दिली होती.

 

मात्र, ऐनवेळी धान्य पुरवठा आणि वाहतुकीत आलेल्या अडचणींमुळे हजारो गरीब कुटुंबे धान्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती.

 

याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर, पुरवठा विभागाने तातडीने ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरणासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पुणे विभागातील पुणे, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माथाडी कामगारांचे आंदोलन सुरू होते. तसेच धान्य उचलण्यासाठी आणि गोदामातून ते वाहनांमध्ये भरण्यासाठी हमाल पूर्ण क्षमतेने उपस्थित राहत नव्हते.

 

परिणामी, मुख्य तालुका गोदामांमधून स्वस्त दुकानांपर्यंत धान्य पोचविण्यास जास्त कालावधी लागला. पुरेशा पुरवठ्याअभावी रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचवण्यात अडचणी येत होत्या.

 

राज्य सरकारने आधी १५ जून ही अंतिम मुदत दिली असली, तरी प्रत्यक्षात वितरणाची स्थिती चिंताजनक होती. पुणे शहरात १२ जूनपर्यंत केवळ ३३ टक्के धान्य पुरवठा झाला होता तर १५ जूनपर्यंत हे वितरण ७०.०५ टक्क्यांवर पोहोचले होते.

 

तसेच सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यांचे ई-पॉसद्वारे वितरण केवळ ३८.६७ टक्के इतकेच वितरण झाले होते. त्यामुळे सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार असोसिएशनने १२ जूनला निवेदनाद्वारे मुदतवाढीची मागणी केली होती, असे सांगण्यात आले.

 

धान्य वाटपाची ही संथ गती पाहता लाखो गरीब कुटुंबे उपाशी राहण्याची वेळ आली असती. ‘लोकमत’ने या गंभीर परिस्थितीवर सविस्तर प्रकाश टाकून प्रशासनाचे डोळे उघडले.

 

‘लोकमत’च्या वृत्ताची गंभीर दखल घेत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे (पुरवठा शाखा) प्रभारी उपायुक्त दिनेश तावरे यांनी १५ जूनला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिवांना तातडीने पत्र पाठवले.

 

माथाडी कामगारांच्या संपामुळे आणि हमालांच्या कमतरतेमुळे गोदामांतून रेशन दुकानांपर्यंत धान्य वेळेत पोहोचू शकलेले नाही. कोणताही पात्र लाभार्थी हक्काच्या अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी पुणे विभागातील सातारा जिल्हा वगळता पुणे, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना ३० जूनपर्यंत धान्य मिळण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी.

 

त्यानुसार आता ही मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहरातील आणि ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभघेता येणे शक्य झाले आहे.

 

पुरवठा विभागाचे आवाहन

या निर्णयामुळे पुणे विभागातील लाखो गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, रेशन दुकानांसमोर होणारी गर्दी आणि गोंधळ टळणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, ३० जूनपूर्वी आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा देऊन आपले धान्य मिळवून घ्यावे, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -