गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा अखेर प्रवाहित झाला आहे. हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याची चादर आणि कोसळणारा धबधबा यामुळे परिसराचे निसर्गरम्य सौंदर्य खुलून आले असून वर्षा पर्यटनाचा हंगामही सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
राधानगरी धरण परिसरातील हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरतो. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धबधबा प्रवाहित झाल्याची माहिती समोर येताच अनेक पर्यटकांनी आज येथे भेट देत निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. धबधब्याच्या परिसरात फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळाली.
हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने धबधब्याचा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पावसाळ्यात धबधब्याजवळील दगड निसरडे होत असल्याने पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, सुरक्षित अंतर राखावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. राऊतवाडी धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे.





