जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुराने उद्ध्वस्त झालेल्या वीज यंत्रणा दुरुस्तीत महावितरण प्रशासनाच्या नियोजनाचा अडथळा निर्माण झाला आहे. दोन महिने उलटले तरी नऊ हजार खांबांपैकी केवळ अडीच हजार खांबांची उभारणी केली; तर साडेसहा हजार खांब अद्याप जमिनीत रुतले आहेत. सध्या सुरू असणार्या संथ गतीच्या कामामुळे भविष्यात शेती पंपांच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे.
जुलै महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. महापुराने महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नदीकाठच्या वीज यंत्रणेचा पुरामुळे बोजवारा उडाला. हजारो खांब विद्युत वाहिन्या डीपी बॉक्स, ट्रान्स्फॉर्मरसह वीज यंत्रणेस मोठ्या प्रमाणात फटका बसला. शेकडो गावांंचा वीजपुरवठा खंडित झाला.
गावठाणमधील वीज यंत्रणा दुरुस्त करण्यात महावितरणला यश आले आहे. मात्र नदीकाठच्या शेती पंप आणि वीज यंत्रणेची दुरुस्ती मात्र अद्याप अपूर्ण आहे. सतत पडणारा पाऊस नदीकाठी असणारे चिखलाचे साम्राज्य या समस्या असल्या तरी मुख्यत: महावितरण प्रशासनाचा नियोजनाचा अभाव प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे.
दिवसभरात कोणत्या भागात मनुष्यबळ, साहित्याची जोडणी लावून काम करायचे याचे पक्के नियोजन नसल्याने कर्मचार्यांसह एजन्सीहीची दमछाक होत आहे. एखाद्या भागातून तक्रार आली की सुरू असणारे काम बंद ठेवून त्या ठिकाणी यंत्रणा पाठविण्याचा प्रकार सुरू आहे.
जिल्ह्यात उच्च दाबाचे 1718 खांब खराब झाले आहेत. त्यापैकी दोन महिन्यात केवळ 712 खांब दुरुस्त केले आहेत. तर लघुदाबाचे 7556 खांब नादुरुस्त आहेत. त्यापैकी 1885 खांब दुरुस्त करण्यात यश आले आहे. यावरून दुरुस्तीच्या कामाची गती लक्षात येते. खांब मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाल्याने प्रशासनाने ठोकताळा बांधून मोठ्या प्रमाणात खांब आयात करणे आवश्यक होते. तीच परिस्थिती कंडक्टर व इतर साहित्याची झाली आहे.
साहित्यच उपलब्ध नसल्याने दुरुस्तीच्या कामात मर्यादा येत आहेत. ट्रान्स्फॉर्मरची अवस्था यापेक्षा फारशी वेगळी नाही. महावितरण कंपनीने मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून दक्षता घेतली आहे. जिल्ह्यातील एजन्सीसह बाहेरून मोठ्या प्रमाणात एजन्सीची कुमक मागविली आहे. मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
मात्र साहित्याची वानवा असल्याने एजन्सींच्या कर्मचार्यांना काम मिळत नाही. परिणामी काही एजन्सींनी कर्मचार्यांना परत पाठविल्याची चर्चा सुरू झाली आहे. महापुराने 77632 शेती पंप ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यापैकी सध्या 39591 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला असून अद्याप 38041 ग्राहकांचा वीज पुरवठा अद्याप खंडित आहे.