Homeमहाराष्ट्रएसटी महामंडळाची आधी भाडेवाढ, नंतर माघारीची घोषणा ; गणपती उत्सवाच्या एकेरी गट...

एसटी महामंडळाची आधी भाडेवाढ, नंतर माघारीची घोषणा ; गणपती उत्सवाच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

गणेशोत्सवापूर्वी एकेरी गट आरक्षण करून एसटीने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रवास भाड्यात अतिरिक्त ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

तसेच शासनाने निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रवासी संघटनांनी दिला होता.

 

कोकणवासीयांची मागणी लक्षात घेऊन एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाडेवाढीचा निर्णय जाहीर करणे आणि नंतर तो मागे घेणे, अशी भूमिका एसटी महामंडळाने यापूर्वीही घेतली आहे. त्यामुळे भाडेवाढीचा आणि माघारीचा कित्ता कायम असल्याची टीका महामंडळावर करण्यात येत आहे.गौरी-गणपती सणासाठी गट आरक्षण पद्धतीने मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांकडून एसटी महामंडळ अतिरिक्त ३० टक्के प्रवासी भाडे आकारणी,

 

महामंडळाने यापूर्वी केलेली १३.५ टक्के कायमस्वरूपी प्रवासी भाडेवाढ; अशा दोन्ही मिळून प्रवाशांना गावी जाण्यासाठी तब्बल ४३.५० टक्के भाडे वाढ सोसावी लागण्याची चिन्हे होती. त्यामुळे भाडेवाढीचा परिवहन मंत्र्यांनी फेरविचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिला. याबाबत एसटी महामंडळाने कोकणवासीयांच्या भावनांचा आदर करून यावर्षी एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

याबाबतचे परिपत्रक लवकरच एसटी प्रशासनाकडून जारी करण्यात येईल.मुंबई, ठाणे येथील आपल्या घरापासून कोकणातील वाड्या-वस्त्यांपर्यंत एसटी बसने थेट जाता येत असल्याने कोकणवासी नेहमीच एसटीला प्राधान्य देत आले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सरासरी ५ हजार बस आरक्षित केल्या जातात. यावर्षी एसटी महामंडळाचा वाढता तोटा कमी करण्यासाठी नाईलाजास्तव एकेरी गट आरक्षणावर ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

 

वाढत्या तोट्यामुळे अतिरिक्त शुल्क

 

दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून सुमारे ५ हजारांहून अधिक बसेस एसटी महामंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जातात. या विशेष वाहतुकीसाठी राज्यातील इतर विभागांतून दोन-तीन दिवस आधी बस मागविल्या जातात. एकेरी गट आरक्षणामुळे कोकणात प्रवाशांना सोडल्यानंतर या बसेस रिकाम्या परत आणाव्या लागतात. त्यामुळे एसटी महामंडळावर इंधनाचा खर्च तसेच चालक-वाहकांच्या अतिकालीन भत्त्याचा अतिरिक्त भार पडतो. त्यातच डिझेलच्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या अतिकालीन भत्त्यात वाढ झाल्याने एसटीच्या तोट्यात मोठी वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून एसटी महामंडळाने यावर्षीपासून एकेरी गट आरक्षणावर ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, एका कुटुंबात ३० टक्के अतिरिक्त शुल्क हे पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांला लागू होते. अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना १५ टक्के भार सहन करावा लागला असता. सध्या खासगी वाहतूकदारांनी वाढलेली तिकीट दर वाढ लक्षात घेता ही अतिरिक्त शुल्क वाढ किफायतशीर होती.

 

परिवहन मंत्र्यांचे निर्देश

 

कोकणवासीयांच्या भावना आणि मागणी लक्षात घेऊन हे शुल्क आता रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला होणारा संभाव्य आर्थिक तोटा इतर मार्गांवरील प्रवासी वाहतूक वाढवून भरून काढावा, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -