आष्टी तालुक्यातील कडा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका १८ वर्षीय तरुणावर धारदार चाकूने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली.
जुन्या वादातून हा रक्तरंजित प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेहान अन्वर शेख (वय १८, रा. कडा, ता. आष्टी) असे चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिरवणुकीतून बाजूला बोलावून बारवाजवळ केला वार मिळालेल्या माहितीनुसार, कडा येथील एका स्थानिक गणेश मंडळाच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक गुरुवारी सायंकाळी उत्साहात निघाली होती. ग्रामपंचायत कार्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे ही मिरवणूक राम मंदिराकडे जात होती. रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास मिरवणुकीत सहभागी असलेल्या रेहान शेख याला ३ ते ४ तरुणांनी काहीतरी बोलायचे आहे असा बहाणा करून बाजूला बोलावले. त्याला शहरातील जुन्या बारवाजवळ नेण्यात आले. तेथे पोहोचताच काही कळायच्या आत संशयित हल्लेखोरांनी कमरेला लपवलेले धारदार चाकू काढून रेहानच्या छातीवर, पोटावर आणि हातावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळलेल्या रेहानला पाहून परिसरात एकच आरडाओरड आणि धावपळ उडाली. या गोंधळाचा फायदा घेऊन हल्लेखोर अंधारातून पसार झाले.
प्रकृती चिंताजनक; अहिल्यानगरला हलवले, पोलिसांची पथके रवाना घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रेहानला तात्काळ कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, रक्तस्त्राव जास्त झाल्याने आणि जखमा खोल असल्याने प्रथमोपचार करून त्याला रात्रीच अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
त्याची प्रकृती सध्या अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कडा पोलीस चौकी व आष्टी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा कट रचून हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी पसार झालेल्या संशयित हल्लेखोरांच्या शोधासाठी स्वतंत्र पथके रवाना केली असून पुढील तपास सुरू आहे.
