काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार्या रेशन गहू, धान्यप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर जांभळी (ता. शिरोळ) येथील गीतादेवी अॅग्रो प्रोसेसिंग मिलच्या धान्य साठ्याचा पंचनामाही करण्यात आला आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेत पुरवठा विभागाचा पंचनामा महत्त्वाचा होता. परंतु; पंचनाम्यात टेम्पोमध्ये ज्वारी, वेस्टेज गहू, तांदूळ व इतर धान्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे रेशन धान्य दुकानदार व टेम्पोचालक यासह एकूणच प्रकरणाबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
सोसायटीच्या रास्त भाव धान्य दुकानासमोरून पसार झालेला टेम्पो जांभळीच्या गीतादेवी आटा चक्की कंपनीत गेला. ही कंपनी गव्हापासून रवा, मैदा, पिट्टी अशा प्रकारचे उत्पादन करते, तर या ठिकाणी ज्वारी असलेला टेम्पो कसा गेला, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. पुरवठा विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीमध्ये कोणतेही रेशनचे धान्य आढळून आले नसल्याचे सांगण्यात आले. पुरवठा विभागाने गीतादेवी अॅॅग्रो मिलची काही रजिस्टर ताब्यात घेतली आहेत. मात्र, यामध्ये फक्त खरेदी केलेल्या धान्याच्या नोंदी आहेत.