शाकंभरी पौर्णिमेदिवशी (दि. 17) यल्लम्मा डोंगरावरील रेणुका मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बुधवारी तसा आदेश बजावला. कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून रोज 10 हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. बुधवारी या संख्येने 21 हजारचा टप्पा गाठला. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
संक्रांतीनंतर येणार्या शाकंभरी पौर्णिमेदिवशी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा तसेच विविध राज्यांतून लाखो भाविक यल्लम्मा डोंगरावर दाखल होतात. त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण, कोरोनामुळे कडक निर्बंध असल्याने भाविकांना मंदिरात जाता येणार नाही.
गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने बेळगाव जिल्ह्यातील नऊ मंदिरे भाविकांसाठी बंद करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने बजावला होता. त्यामध्ये यल्लम्मा डोंगरावरील रेणुका मंदिराचाही समावेश होता.