सव्वातीन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी गुरुवारी कोल्हापुरातील रमणमळा परिसरात सापळा रचून जप्त करण्यात आली. कोल्हापुरात अशाप्रकारे ही पहिलीच कारवाई आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुगंधी द्रव्य, सौंदर्य प्रसाधने आणि काही औषधांसाठी व्हेल माशाच्या उलटीला मोठी किंमत आहे.
वन विभाग आणि पोलिस विभागाने संयुक्त कारवाई केली. ही उलटी त्यांनी नेमकी आणली कोठून? याचा शोध सुरू असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील विश्वनाथ नामदास, आलमशाह मुल्ला, उदय जाधव, रफीक सनदी, किस्मत नदाफ, अस्लम मुजावर (सर्व रा. सांगली जिल्हा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. या कारवाईत सव्वातीन कोटींच्या उलटीसह एक चारचाकी, दोन दुचाकी व पाच मोबाईल असा एकूण 3 कोटी 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सांगली जिल्ह्यात व्हेल माशाची उलटी विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती कोल्हापूर वन विभागाला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. या टोळीवर वन विभागाने लक्ष केंद्रित केले. वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना सक्रिय करण्यात आले होते. त्यांनी माहिती जमा करत टोळीतील प्रमुखांशी संपर्क साधला तेव्हा कोल्हापुरातील काहीजण ही उलटी विकत घेण्यास इच्छुक असल्याचे भाटे यांनी त्याला सांगितले.