रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या अधिसूचनेत सांगितले की, सरकार पुढील वर्षापासून सर्व वाहनांची फिटनेस तपासणी करणे अनिवार्य करणार आहे. यासाठी एप्रिल 2023 पर्यंत नवीन ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन्स (ATS) तयार केले जातील, जे खाजगी कंपन्याद्वारे चालवले जातील. एटीएसमार्फत वाहनांची फिटनेस चाचणी अनिवार्य करण्याची योजना आहे. याबाबत जनतेचे मत जाणून घेण्यासाठी एक मसुदा सादर करण्यात आला आहे. एटीएसमध्ये वाहनांची फिटनेस तपासणी विविध तांत्रिक उपकरणांच्या मदतीने स्वयंचलित पद्धतीने केली जाणार आहे.
तसेच 1 जून 2024 पासून मध्यम आकाराची वाहने, प्रवासी वाहने आणि लहान मोटार वाहनांसाठी ही फिटनेस चाचणी अनिवार्य आहे. गेल्या वर्षी केंद्राच्या वाहन भंगार धोरणानंतर ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार १५ वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनांसाठी आणि २० वर्षे जुन्या खासगी वाहनांसाठी फिटनेस चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. गेल्या वर्षी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले होते की, खासगी आणि व्यावसायिक वाहनांच्या फिटनेसची चाचणी घेण्यासाठी एटीएस स्थापन करण्याची परवानगी राज्य सरकारे आणि कंपन्यांना दिली जाऊ शकते.