घरातून क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर गेलेल्या अकरा वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर परिसरात घडली आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सातपूर पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंभूशरण केदार शर्मा रा. श्री. दर्शन रो हाऊस सर्वे नंबर 207 प्लॉट नंबर 9 राधाकृष्ण नगर, हिंदी शाळेजवळ यांनी दाखल केलेल्या तक्रीरीनुसार, त्यांचा मुलगा निशांत उर्फ राजाबाबू शंभूशरण शर्मा (11) हा दोन दिवसापूर्वी सायंकाळी घराच्या बाहेर क्रिकेट खेळण्यासाठी गेला असता तो परत आलाच नाही.
मुलगा घरी परत न आल्याने शंभूशऱण केदार शर्मा यांनी सर्वत्र चौकशी केली, मात्र मुलाचा शोध लागला नाही. याबाबत वडील शंभूशरण शर्मा यांनी सातपूर पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे. पोलिसांनी मुलाचे अपहरण झाले असा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघ तपास करत आहेत.