शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या पावनखिंड या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदविला गेला आहे. पहिल्याच दिवशी १५३० शोजसह ‘पावनखिंड’ चित्रपटगृहात दाखल झाला. तर शनिवारी ४२१ चित्रपटगृहांमध्ये १९१० शोज लागले. एवढया विक्रमी संख्येने ‘पावनखिंड’ची जोरदार घौडदौड सुरु आहे. मराठमोळा पोशाख, नऊवारी साडी, फेटे, ढोल-ताशे आणि तुताऱ्यांच्या निनादात ‘पावनखिंड’चे शो पाहिले जात आहेत. आलमंड्स क्रिएशन्स निर्मित आणि ए.ए.फिल्म्स प्रस्तुत पावनखिंड’ या चित्रपटाला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’पासून प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
‘पावनखिंड’ या चित्रपटात वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची यशोगाथा पहायला मिळत आहे. लॅाकडाऊन आणि निर्बंधांमुळं प्रदर्शनापासून वंचित राहिलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. त्यातच ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या यशस्वी चित्रपटांमुळे ‘पावनखिंड’ चित्रपटाकडून अपेक्षा खूप वाढल्या होत्या. अनोखे टिझर, लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक ट्रेलर आणि आघाडीच्या कलाकारांच्या फळीमुळं रसिकांची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली होती. पहिल्या दिवशी सिनेप्रेमींनी ‘पावनखिंड’ पाहण्यासाठी केलेली गर्दी हा त्याचाच परिपाक असल्याचं चित्रपट माध्यम आणि व्यवसायतज्ज्ञांचं म्हणणं आहे.