ताजी बातमी ऑनलाईन टीम
तासगाव येथील इंदिरानगर येथे पतीचा खून करून आत्महत्या असल्याचे दर्शवणाऱ्या आरोपी पत्नीस आज जन्मठेप व दहा हजार दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. शांताबाई उर्फ शोभा कल्लाप्पा बागडी (वय २५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी तासगाव) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपी पत्नीचे नाव असून सांगली येथील अति जिल्हा व सत्र न्यायाधीश- १ आर. के. मलाबादे यांनी ही शिक्षा सुनावली.
सदरचा गुन्हा तासगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सन २०१९ मध्ये घडला होता. आरोपी महिला आपल्या पतीसोबत इंदिरानगर तासगाव येथे एकत्रित राहत होते. मयत पतीला टि. बी. चा त्रास असल्यामुळे तो कामधंदा करु शकत नव्हता. एके दिवशी घरगुती वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी शांताबाई हिने रात्रीच्या वेळी धारदार वस्तारने पतीचा गळा चिरुन खून केला. शिक्षेपासून वाचता यावे म्हणून स्वतःच पोलीस स्टेशन मध्ये जावून पतीने आत्महत्या केल्याची खोटी तक्रार तिने नोंद केली. सांगली येथील सेशन न्यायालयात खटला दाखल झाला. चौकशीदरम्यान एकूण दहा साक्षीदार तपासले असता न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सदर खटल्यावेळी मयताची आई, वैदयकीय अधिकारी तसेच तपास अधिकारी दंडिले यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.