ताजी बातमी ऑनलाईन टीम
पंचगंगा नदीचे प्रदूषण गंभीर बनले आहे. गेल्या अनेक वर्षांत प्रथमच पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याचे गुरुवारी उघड झाले. या मृत माशांचा अक्षरश: खच पंचगंगा नदीपात्रात सुर्वे बंधार्यानजीक पडला आहे. काही काळ सुमारे अर्धा किलोमीटर नदीचे पात्रच या माशांच्या थराने दिसायचे बंद झाले होते.
इतकी भयाण परिस्थिती असतानाही प्रशासनाने पंचनामा करण्यापलीकडे काही केले नाही. शनिवारी उशिरापर्यंत हे मृत मासे पाण्याबाहेर काढण्याचीही तसदी घेतली नव्हती. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणाचे कसलेच सोयरसूतक प्रशासनाला नसल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
शुक्रवारी पहाटेपासून मासे मृत होण्याचे प्रमाण वाढत गेले. शनिवारी वळिवडे (ता. करवीर) येथील सुर्वे बंधार्यानजीक कित्येक मीटरवर केवळ आणि केवळ मृत मासेच दिसत होते. प्रजासत्ताक सामाजिक संस्था आणि ई वॉर्ड लोककल्याण व संघर्ष समितीने प्रदूषण नियंत्रण मंडळाला या घटनेचा पंचनामा करण्यास भाग पाडले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नीलेश भरमळ यांनी पंचनामा केला. दोन ठिकाणचे पाण्याचे नमुने घेण्यात आले. तसेच मृत मासेही रासायनिक पृथ्थ:करणासाठी घेण्यात आले. यावेळी दिलीप देसाई, अॅड. बाबा इंदुलकर, सागर नामगावे उपस्थित होते.