Sunday, July 6, 2025
Homeराजकीय घडामोडीदिशा सालियन प्रकरणी नारायण राणेंसह नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल!

दिशा सालियन प्रकरणी नारायण राणेंसह नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सलियनच्या मृत्यू प्रकरणी नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचा मुलगा भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियनबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात मालवणी पोलिस ठाण्यात (Malvani Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सलियनबाबत सतत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप दोघांवर करण्यात आला आहे.



महिला आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांचा महिला आयोगाला रिपोर्ट सादर झाल्यानंतर रात्री 12 वाजता मालवणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या अहवालात दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालात तिच्यावर लैंगिक बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ती गरोदर नव्हती हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. नारायण राणे यांनी दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात लाखोंच्या संख्येने निर्माण करण्यात आलेल्या बोगस ट्विटर हॅण्डलची देखील चौकशी होणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, ‘दिशाच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नाही आणि ती गरोदरही नव्हती. दिशाच्या मृत्यूबाबत खोटी आणि बदनामीकारक माहिती देणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.’



दिशा सालियन प्रकरणात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना पत्र लिहून भाजप नेते नारायण राणे असंवेदनशील राजकारण करून दिशा सालियन आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या काही सदस्या दिशा सालियनच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी तिच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी सालियनच्या आई-वडिलांनी सुद्धा राजकीय स्वार्थासाठी आमच्या मुलीची नाहक बदनामी केली जातेय, असा आरोप करत महिला आयोगाकडे तक्रार केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -