बऱ्याचदा लोक पाठीच्या दुखण्याला सामान्य दुखणे समजून दुर्लक्ष करतात. तुम्ही सुद्धा असे करत असाल तर सावधान व्हा! कारण पाठदुखी हे किडनी विकाराचे लक्षण देखील असू शकते. आज (10 मार्च) जागतिक किडनी दिवस आहे. त्यानिमित्त तुम्हाला सांगणार आहोत किडनीचे दुखणे आणि पाठीचे दुखणे यांच्यातील फरक. जेणे करून किडनी विकारसंबंधी माहिती होत तुम्हाला तुमचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया माहिती.
किडनी आणि पाठदुखीतील फरक
– व्यक्तीला पाठीच्या खालच्या भागात दुखत असेल आणि पोटात देखील दुखत असेल तर हे किडनी विकाराचे लक्षण असू शकतात. जर फक्त पाठीत दुखत असेल तर ही पाठदुखीची समस्या असल्याचे लक्षात घ्यावे.
– व्यक्तीला पाठीच्या खालच्या भागात दुखत असतांना पोटात कुठल्याही प्रकारचे दुखणे नसेल तर हे किडनी विकाराचे लक्षण नाही हे लक्षात घ्यावे. एखाद वेळेस काही दुखापत झाली असल्यास असा त्रास होतो.
– किडनी विकार असल्यास फक्त मोजक्या भागात दुखणे जाणवते. मात्र पाठीचे दुखणे हे मोठ्या भागात म्हणजेच पूर्ण पाठीत जाणवते. किडनीचे दुखणे हे पाठदुखीच्या त्रासापेक्षा तीव्र असते. ज्यामुळे त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणे गरजेचे असते.
किडनी विकार असलेल्यांना कायम दुखणे जाणवते किंवा कमी अधिक प्रमाणात दुखणे जाणवते. तर दुसरीकडे पाठीचे दुखणे हे आपोआप नाहीसे होते. पाठदुखी ही दीर्घकाळ त्रास देत नाही. मात्र पाठीला काही जखम किंवा गंभीर समस्या झाली असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
-व्यक्तीला पाठीत एका बाजूला सतत दुखत असेल तर हे किडनी विकाराचे लक्षण आहे. जर दोन्ही बाजूला दुखत असेल तर हा त्रास जड वस्तू उचलल्याने देखील होऊ शकतो. मानेच्याखाली दुखणे हे देखील पाठदुखीचे लक्षण आहे.
– तुम्हाला हीप्समध्ये दुखणे जाणवत असेल किंवा पाय सुन्न पडल्यासारखे जाणवत असले तर हे पाठदुखीचे लक्षण आहे. पायातील नसांमध्ये कमजोरी आली असल्यास अशा प्रकारचे दुखणे जाणवत. या स्थितीत डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे.
– पाठीच्या वरच्या भागातील दुखणे हे पाठदुखीची समस्या आहे. किडनी विकाराचे दुखणे हे पाठीच्या खालच्या भागात जाणवते.
लघुशंका करताना त्रास होत असेल तर किडनी इन्फेक्शनचे लक्षण आहे. कारण इन्फेक्शनमुळे असा त्रास होतो. लघुशंका करताना जर रक्तस्त्राव होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. हे किडनी स्टोनचे एक लक्षण आहे.