इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2022) अर्थात आयपीएलचा 15 वे सीझण येत्या 26 मार्चपासून सुरु होणार आहे. मात्र, त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे. Ipl मधील क्रिकेटपटूंसाठी आणलेली बस मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ताज हॉटेलसमोर ही घटना घडली. क्रिकेटपटूंना ने-आण करण्याचे काम मुंबईतील वाहतूक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
काय आहे प्रकरण?
IPL 2022 चा 15 वे सीझण येत्या 26 मार्चपासून सुरु होणार आहे. तर 29 मे रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. मात्र, आयपीएलमधील क्रिकेटपटूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी मुंबईत आलेली बस मंगळवारी रात्री फोडली. यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यासाठी वाहतुकीची व्यवस्थेचे काम महाराष्ट्रातील वाहतूक व्यावसायिकांना डावलून इतर राज्यातील व्यावसायिकांना देण्यात आले आहे. आयपीएल व्यवस्थापन आणि सरकारकडे याबाबत वारंवार विनंती करून देखील त्यावर काही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मुंबईतील मनसे वाहतूक सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी दणका दिल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी माहिती दिली आहे.
IPL च्या 15 व्या सीझनमधील पहिली लढत चेन्नई- कोलकाता संघात रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 26 मार्च रोजी ही लढत होणार आहे. मुंबईत वानखेडे, ब्रेबॉर्न तर नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर IPL मधील लढती खेळवल्या जाणार आहेत.
दुसरीकडे, राज्यातील महापालिका निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संकेत दिले आहेत. निवडणुकीसाठी तयार राहा, असे राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहेत. आगामी निवडणुकीच्या रिंगणात मनसे स्वबळांवर उतरणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.