रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेवर गंभीर परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक फटका हा अशिया खंडात भारताला बसला आहे. पुरवठा साखळी खंडित झाल्याने आयात निर्यात प्रभावित झाली आहे. त्यामुळे देशात महागाई भडकण्याची चिन्हे असून, महागाईत दहा ते पंधरा टक्के वाढ होण्याचा अंदाज अर्थ तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. महागाईने हैराण झालेल्या ग्राहकांना येत्या काही दिवसांमध्ये दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंसाठीही अधिक खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. गहू तेल आणि पॅकेजिंग सामानाचे दर वाढल्याने एफएमसीजी कंपन्या आपल्या उत्पादनाच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. तर यापूर्वीच अनेक कंपन्यांनी आपले दर वाढवले देखील आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे एफएमसीजी कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दरवाढ अटळ मानली जात आहे. महागाई वाढत असताना देशात इंधनाचे दर मात्र स्थिर असल्याने सर्वसामान्यांना थोडा का होत नाही मात्र दिलासा मिळाला आहे.
रशिया आणि युक्रने युद्धामुळे एफएमजीसी कंपन्यांना मोठा झटका लागला आहे. युद्ध परिस्थितीमुळे गहू, खाद्य तेल आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. कच्चा माल महाग झाल्याने कंपनीत तयार केलेले उत्पादन आता पूर्वीच्या किमतीला विकणे परवडत नाही. कंपन्यांचे मार्जीन ऑलरेडी कमी झाले आहे. दरवाढ न केल्यास कंपन्या तोट्यात जाऊ शकतात. त्यामुळे दरवाढ करावी लागणार असल्याचे काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान उत्पादनाच्या किमती वाढवल्यास त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार असून, ग्राहकाचे बजेट कोलमडणार आहे.
दरम्यान कंपन्यांकडून आपल्या उत्पादनाचे दर वाढवण्यास सुरुवात झाली असून, हिंदूस्थान युनिलिव्हरने आपल्या उत्पादनाचे दर वाढवले आहेत. साबन, चहा कॉफी अशा प्रत्येक प्रोडक्टच्या किमतीमध्ये कंपनीकडून दाहा ते पंधरा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असून, कच्च्या मालाचे दर वाढल्याने कंपनीने दरवाढीचा निर्णय घेतल्याचे कंपनी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.