चौदा वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला. गणेशने फेटे बांधणीचा व्यवसायही वाढवत नेला. परिणिती व शिवम अशी दोन मुले झाल्यानंतर एक सुखी कुटुंब म्हणून हुबाळे परिवार नांदू लागला.
पण, संशयाचे ग्रहण लागल्याने या संसाराची अक्षरशः राखरांगोळी होण्यास वेळ लागला नाही.
पती-पत्नीतील वाद विकोपाला जाऊन आईला जीव गमवावा लागला, तर वडील गजाआड गेल्याने बिचाऱ्या मुलांची फरपट होत आहे. सध्या परिणिती व शिवमला मामाचा आधार असला, तरी दोन्ही मुले आईविना पोरकी झाली.
गणेश हुबाळे याची २०१२ मध्ये स्वाती यांच्याशी ओळख झाली. दोघांच्या प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले. मोठी मुलगी परिणिती आता १३ वर्षांची आहे, तर मुलगा शिवम दहा वर्षांचा आहे. सोन्या मारुती चौकात एकत्र कुटुंबात सर्वजण राहण्यास होते. मात्र, मागील चार वर्षांत त्यांच्या सुखी संसाराला संशयाचे ग्रहण लागले. गणेशचे बाहेर कोणाशीतरी संबंध असल्याचे समजल्याने स्वातीसोबत भांडण होऊ लागले. यातून पुढे गणेश एकटाच राहू लागला.
गणेश व स्वाती वेगवेगळे राहात होते. दोघांतील वादामुळे मुलांची मात्र फरपट सुरू होती. सात फेब्रुवारीलाही स्वाती अपेक्षेने गणेशसोबत चर्चा करण्यास गेल्या असताना पुन्हा भांडण झाले. यातूनच त्याने स्वाती यांचा गळा दाबून जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी आईचा मृत्यू मुलांनी डोळ्यांदेखत पाहिला.






