पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पुण्यातील तरुणांमध्ये कायद्याची भीती राहिली नसल्याचे दिसून येत आहे. गुन्ह्यांच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून एका तरुणाची कोत्याने वार करुन निर्घृण हत्या (Murder Case) करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली असून सध्या हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल (Viral Video) होत आहे. एखाद्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ही घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ ही घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. एका तरुणाची पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करुन हत्या केली. मारुती लक्ष्मण ढेबे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 20 वर्षांचा मारुती वारजे येथे राहणारा आहे. अतिशय निर्घृणपणे मारुतीची हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असण्याचा संशय पोलिसांनी (Pune Police) व्यक्त केला आहे.
मारुती ढेबे हा तरुण नांदेड फाट्यापासून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेला होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून पाच ते सहा जण आले. आरोपींच्या हातामध्ये कोयाता होता. त्यांनी मारुतीवर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मारुतीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रस्त्याच्या पलिकडे असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मारुतीची हत्या केल्यानंतर आरोपी लाल रंगाच्या कारमध्ये बसून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी अवस्थेत मारुतीला रुग्णालयात हलवले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याला मृत घोषीत केले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हवेली पोलिसांकडून या हत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.