राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नसल्याने लाभार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
डिसेंबरपासून काही महिलांना एकाही महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे रखडलेले सर्व हप्ते एकत्र मिळणार का, असा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे.
योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या त्रुटींमुळे अनेकांचे पैसे थांबले आहेत. केवायसी करताना काहींनी चुकीची माहिती भरली, तर काहींची कागदपत्रे प्रणालीत योग्यरीत्या अपडेट झाली नाहीत. परिणामी डिसेंबर, जानेवारी आणि त्यानंतरचे हप्ते रोखले गेल्याचे समोर आले आहे.
सरकारने या पार्श्वभूमीवर ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. लाभार्थींनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती तपासून दुरुस्ती करणे अनिवार्य आहे.
निर्धारित मुदतीत केवायसी पूर्ण न केल्यास पुढील हप्तेही बंद होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महिलांनी तातडीने आपली कागदपत्रे आणि माहिती पडताळून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, केवायसीतील चुका दुरुस्त झाल्यानंतर रखडलेले सर्व हप्ते एकत्र जमा होतील का, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार, पात्रता निश्चित झाल्यानंतर थकीत रक्कम एकरकमी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांचे मिळून ६००० रुपये महिलांच्या खात्यात एकत्र जमा होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
तथापि, यासंदर्भात अधिकृत आदेश येईपर्यंत लाभार्थींनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही सांगण्यात येत आहे. सध्या सर्वांचे लक्ष ३१ मार्चच्या अंतिम मुदतीकडे लागले असून, त्याआधी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक ठरणार आहे. सरकारकडून लवकरच स्पष्ट भूमिका जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





