ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यभरातील कोरोना व्हायरसचा (Covid-19) प्रादूर्भाव आटोक्यात येत असताना राज्य सरकारने शाळेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण शासननिर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे, राज्यातील सर्व शाळा 100 टक्के उपस्थितीसह पूर्णवेळ सुरू (100 % Schools Opened in Maharashtra) करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वातील सरकारने परवानगी दिली आहे. याशिवाय एखाद्या शाळेला रविवारी शाळा भरवायची असेल तर त्यासाठी देखील परवानगी असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर तब्बल दोन वर्षांनी पहिल्यांदाच शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशात शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात होते. परंतु काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करून शाळा सुरु (schools open in Maharashtra) करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय देण्यात आले होते. आता राज्यातील सर्व शाळा 100 टक्के उपस्थितीसह पूर्णवेळ सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. मात्र, या शैक्षणिक वर्षात मार्चपासून एप्रिलअखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू करावे, असे शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.