ताजी बातमी ऑनलाईन टीम
निपाणी : वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना कोथळी (ता. चिकोडी) येथे बुधवारी घडली. घटनेची नोंद खडकलाट पोलिसांत झाली आहे. महावीर भरमू जिगन (वय २४, रा. हंड्यानवाडी) असे मृताचे नाव आहे. कोथळी येथील यात्रेसाठी महावीर बुधवारी मंडप उभारण्यासाठी गेला होता.
यावेळी परिसरात असलेल्या नारळाच्या झाडाच्या बाजूला लोखंडी पाईप उभा करत असताना वीजवाहिनीचा लोखंडी पाईपला स्पर्श झाल्याने नारळाच्या झाडावर पाईप बांधण्यासाठी चढलेल्या महावीरला विजेचा धक्का बसला. झाडावरून खाली कोसळल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने चिकोडी येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. महावीरचे वडील भरमू जिगण यांनी पोलिसात फिर्याद दिली. घटनास्थळी उपनिरीक्षक लक्ष्माप्पा अरी, हवालदार एन.एस. पुजारी यांनी यांनी पाहणी केली.